वैश्विक महामारी कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशात आटोक्यात येऊ लागला आहे. तसे पाहिले तर दुसर्या लाटेआधी काही काळ असाच दिलासा मिळाला होता, पण तेव्हा निर्बंध लागू होते, परंतु निर्बंध पूर्णपणे उठविल्यानंतरही तिसरी लाट रोखण्यात आपण यशस्वी झालो. त्यामुळे खर्या अर्थाने तमसो मा ज्योतिर्गमय संदेश देणारी दिवाळी आपण यंदा साजरी करीत आहोत.
कोविड-19च्या साध्या डोळ्यांना न दिसणार्या विषाणूने गेले सुमारे दीड वर्ष संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आणि होत्याचे नव्हते केले. या महामारीत अनेकांचा मृत्यू झाला, तर कित्येक कुटूंब उद्ध्वस्त झाली. या दु:खाला अन् हानीला पारावार उरला नाही. कोरोनारूपी संकटाने अखिल मानवजातीला फार मोठा धक्का दिला, ज्याची कंपने दीर्घ काळ जाणवत राहतील. सुरुवातीला यावर काय उपाय करावे याचे उत्तर जगभरातील बड्या बड्या देशांकडे नव्हते. गेल्या वर्षीच्या शेवटी कोरोना प्रतिबंधक लस आली. त्यानंतर नव्या वर्षारंभी अनेक पर्यायदेखील उपलब्ध होऊ लागले. आपल्या देशातही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण सुरू झाले आणि बघता बघता या मोहिमेला जबरदस्त वेग आला. भारताने नुकताच 100 कोटी डोसचा टप्पा पार केला आहे. या लसीकरणाचा परिणाम म्हणजे भारत कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असल्याने जवळपास सर्वच निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यानंतरही संसर्ग वाढलेला नाही. उलट तो कमीच होत आहे. हे एक सुचिन्ह म्हणावे लागले. यंदाची दिवाळी नवी उमेद, नवा उत्साह घेऊन आली आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळीला फार मोठे महत्त्व आहे. संपूर्ण भारतात प्रकाशपर्वाचा हा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज असे त्याचे प्रामुख्याने पाच दिवसांचे पाच टप्पे आहेत. यामागे काही अख्यायिकाही आहेत. दिवाळीच्या दिवसांत दिवे उजळविण्याची प्रथा आहे. दिव्यांबरोबरच आकाशकंदिल, विद्युत माळा यांचीही हल्ली घराला रोषणाई करण्यात येते. या काळात महिलावर्ग स्वादिष्ट फराळ करण्यात मग्न असतात, रांगोळ्या रेखाटतात, तर बच्चेकंपनी फटाके वाजवून, किल्ले बनवून धम्माल करते. दीपावलीच्या आल्हाददायी सकाळी वातावरण छान असते. अशात छान स्वर कानी पडल्यावर कानसेन तृप्त होतात. त्या दृष्टीने संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम म्हणजे पर्वणी असते. पूर्वी महानगरांमध्ये होणारे हे कार्यक्रम अलीकडे प्रत्येक शहरात होऊ लागले आहेत. दिवाळीत जसा चविष्ट फराळ हवाहवासा वाटतो तसाच वैचारिक फराळ म्हणजेच दिवाळी अंकांची महाराष्ट्रात फार मोठी परंपरा आहे. अनेक दर्जेदार अंक दिवाळीत प्रकाशित होत असतात. एकूणच सर्व प्रकारची मेजवानी दिवाळीत मिळते, ज्याने अबालवृद्ध तृप्त होतात. कोरोनाचा संसर्ग देशभरात आटोक्यात आला आहे. असे असले तरी बेफीकिरपणा पुन्हा हे संकट आणू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. जेथे कमी लसीकरण झाले आहे अशा 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांसोबत पंतप्रधान मोदींची बुधवारी बैठक झाली. या वेळी त्यांनी लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन केले. आता प्रत्येकानेच लस घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे पर्यायाने समाजाचे जीवन सुरक्षित करणे आवश्यक आहे. तसा निर्धार या दीपावलीच्या निमित्ताने सर्वांनी मिळून करूया!