महाडसह कोकणाला घाटमाथ्याशी जोडणारा पूर्वापार आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे, महाड-वरंध-भोर-पुणे. मात्र आज कित्त्येक वर्षे या घाटाची दुरवस्था झाली असून भविष्यात हा मार्ग बंद होण्याची भीती आहे. असे झाल्यास कोकणातील नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. संपूर्ण जग रस्त्याने जोडले जात असताना महाड मात्र जगापासून तुटण्याची वेळ आली आहे. कोणे एके काळी महाड या प्रमुख बंदरातून घाट प्रदेशात मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. त्या काळी कौले, सुकी मासळी, मसाल्याचे पदार्थ वरंध घाटातून बैलगाडीच्या सहाय्याने वाहतूक केली जात असे. कालांतराने वाहने आली आणि हा मार्ग डांबरीकरणाचा झाला. कड्यांमधली अवघड वळणे काढून एकेरी वाहतुकीएवढा हा मार्ग त्या काळात प्रवासी वाहतुकीस उपलब्ध होता. जेव्हा बस सेवा सुरू झाली तेव्हा साधारण 1980 च्या दरम्यान पुणे ते महाड किल्ले रायगड ही एसटीची पहिली मिनी बस या मार्गावरून धावली होती. रस्ता अरुंद व घाटमार्ग असल्याने मोठी बस या मार्गाने येऊ शकत नव्हती, मात्र आजही सार्वजनिक बांधकाम विभागाची ही मानसिकता बदललेली नाही. 1985 मध्ये महाड तालुक्यात एमआयडीसी आली, कारखाने आले, महाडचा झपाट्याने विकास होऊ लागला. त्यामुळे अवजड वाहनांसह या घाटातील वाहतूक वाढली. मुळातच या मार्गाला राज्य मार्ग म्हणावा की गाव मार्ग हा प्रश्न पडतो. त्यातच या मार्गाला आता महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र आजही या मार्गाचे हाल कुत्रा खात नाही. या मार्गाचे रुंदीकरण व्हावे, यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली मात्र पुणे बांधकाम विभाग या भोर मार्गाबाबत का उदासीन आहे, हेच कळत नाही. महाड ते वाघजई या महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ता दुरुस्त आहे, मात्र वाघजाई ते हिरडोशी या पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये या मार्गाची खूपच दयनीय अवस्था आहे. महाडसह पोलादपूर, खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यांसाठी पुण्याला जाण्याकरिता हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. हे अंतर 120 किमी एवढे असून प्रवासाला साडेतीन तास लागतात. 2018, 2019, 2020 आणि 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हा मार्ग आणखीनच खराब झाला. तर काही ठिकाणाहून रस्ताच गायबच झाला. करोडो रुपये खर्च करून घाटात संरक्षण भिंती बांधल्या गेल्या, मात्र त्यामुळे केवळ ठेकेदारांचंच भलं झालं, प्रवासी आजही हालअपेष्टा सहन करीत आहेत. 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत घाटात कोसळलेल्या मुसळधार पावसाने डोंगरच्या डोंगर खाली आणले. मोजता येत नाही अशा दरडी या घाटात कोसळल्या आहेत. काही ठिकाणी रस्ताच दरीत कोसळला असून रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठे दगड, झाडांचे ओंडके आणि माती येऊन बसली आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत, तर प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. म्हाप्रळ-पंढरपूर असा असणारा हा महाड-भोर मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे, मात्र महामार्गाचा कोणताच दर्जा या मार्गाला दिसत नाही. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 150 कोटी रुपये खर्च करून या घाटात जागोजागी टोलेजंग संरक्षण भिंती बांधल्या. या वेळच्या मुसळधार पावसात या भिंती तेवढ्या शाबूत राहिल्या, मात्र रस्ता वाहून गेला. महाडकरांची ही तर क्रूर चेष्टा म्हणावी लागेल. आज तर अशी परिस्थिती आहे की हा रस्ता आता दुरुस्त होणे कठीण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची तेवढी कुवत दिसत नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाकडे लक्ष देऊन ज्या पद्धतीने सावित्री पुलाचे बांधकाम अल्पावधीतच पूर्ण केले त्याप्रमाणे या महाड-भोर मार्गाचे काम करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
-महेश शिंदे