उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जुलै ते सप्टेंबर 2019 मध्ये मुदत संपणार्या, तसेच नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता थेट सरपंच व सदस्य पदांच्या निवडणुका घेण्यात येणार असून, तालुक्यातील आवरे व गोवठणे या दोन ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले असून, 31 मे 2019 ते 6 जून 2019 सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
7 जून 2019 रोजी 11:00 वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे, तर नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 10 जून 2019 दुपारी 3:00 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे, तसेच नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर दुपारी 3:00 नंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार असून, अंतिमरीत्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
23 जून 2019 रोजी आवरे व गोवठणे ग्रामपंचायतींचे मतदान घेण्यात येणार आहे, तर 24 जून 2019 रोजी सकाळी 10:00 वाजता उरण तहसील कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली आहे.