Breaking News

एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर; अनेक किलोमीटरची पायपीट

पाली : प्रतिनिधी

कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद होती, ऑक्टोबर महिन्यापासून पाचवीपासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खर्‍या, मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला ब्रेक लागला आहे. शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एसटी बंद असल्याने खाजगी वाहनांचे वाढीव भाडे विद्यार्थ्यांना परवडत नाही, परिणामी रखरखत्या उन्हात अनेक विद्यार्थ्यांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे श्रम, वेळ व पैसे वाया जात आहेत, तर अध्ययनालादेखील ब्रेक लागत आहे. शिवाय वेगवान व अवजड वाहनांची ठोकर बसून अपघात होण्याचा धोकादेखील वाढला आहे. त्यामुळे एसटी बससेवा लवकर सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी पालक व शिक्षकवर्गातून जोर धरत आहे. कोरोनानंतर आम्हाला शाळेत यायला हुरूप आला होता, मात्र शाळा सुरू व एसटी बंद अशी परिस्थिती झाली. उन्हात पायी चालत येताना खूप हाल होतात, गाड्या जवळून जाताना खूप भीती वाटते. अशी व्यथा दोन ते तीन किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या करिष्मा नागोठकर या विद्यार्थिनीने व्यक्त केली. सुधागड तालुक्यातील अनेक गावे वाड्या व वस्त्या दुर्गम भागात आहेत. तेथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी एसटीचाच आधार आहे, मात्र एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहचता येत नाही आहे. शिवाय रानावनातील व खडतर रस्त्यावर चालत शाळेत जाणे व तेथून पुन्हा घरी येणे धोकादायक झाले आहे.  परिणामी विद्यार्थ्यांची अनुपस्थित वाढत आहे आणि त्यांचा अभ्यासदेखील बुडतो.

अनेक विद्यार्थ्यांना शाळेत व घरी पोहचण्यासाठी 3-4 किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करावी लागत आहे. कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने गावात सकाळी व संध्याकाळी येणार्‍या एसटी बस बंद आहेत. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत. एसटी कर्मचार्‍यांचा संप लवकर मिटला पाहिजे.

-अनिल राणे, सचिव, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, सुधागड

एसटी बस बंद असल्यामुळे दूरच्या गावावरून येणार्‍या विद्यार्थ्यांची परवड व गैरसोय होत आहे, तसेच वेळ व श्रमदेखील खूप लागत आहेत. त्याचा मुलांच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. दैनंदिन उपस्थिती अत्यल्प आहे. एसटी बस लवकर सुरू व्हावी.

-दीपक माळी, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय, पाच्छापूर

एसटी बस बंद असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी रोज किमान आठ किमी चालावे लागते. रस्ते खूप खराब व चढणीचे आहेत. शाळेत आणि घरीही वेळेत पोहचत नाही. अभ्यासाला वेळ पुरत नाही. एसटी कर्मचार्‍यांचा संप लवकर मिटला पाहिजे.

-रेश्मा कोकरे, विद्यार्थीनी

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply