पिकांचे नुकसान, बळीराजा हवालदिल
अलिबाग ः प्रतिनिधी
अवकाळी पावसाने ऐन दिवाळीत थैमान घातल्यानंतर पुन्हा बारा दिवसांनी डरकाळी फोडीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत नासाडी केली. हातात आलेले भाताचे पीक पुन्हा पावसाने ओले केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भातशेतीचे पीकही उत्तम तयार झाले. ऐन पावसाळ्यात पुरात शेती अडचणीत आली तरीदेखील बळीराजाने मोठ्या हिमतीने त्या संकटाला तोंड दिले. सोन्यासारखे पीक तयार
झाले होते.
दरम्यान, ऑक्टोबरपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला. गुलाबी थंडीची चाहूल लागली. त्यामुळे तयार पीकाच्या कापणीसाठी सुरुवात झाली, मात्र पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि हवामानात बदल होऊन अवकाळी पाऊसधारा बरसल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतकरीराजाची तारांबळ उडाली. त्यातून सावरत असताना सोमवारपासून हवामानात पुन्हा बदल झाला. अंगातून घामाच्या धारा बरसू लागल्या. या धारांनी पावसाचे संकेत दिले आणि बेसावध न राहता शेतकर्यांनी कापणी, साठवणी आणि मळणीला वेगाने सुरुवात केली, मात्र मंगळवारी आणि बुधवारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे साठवलेल्या भाताच्या रोपांना पाणी लागले. दुपारी अलिबाग तालुक्यासह अन्य भागांतही पाऊस झाला.