Breaking News

अलिबाग तालुक्यात पथनाट्यातून जनजागृती

अलिबाग : जिमाका

विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती अभियानांतर्गत स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग तालुक्यात चित्ररथ फिरवून व पथनाट्यातून मतदार जनजागृती केली. निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने आणि जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात मतदार जनजागृतीविषयी चित्ररथ व पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन शेजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग भाजी मार्केट, बस स्टॅण्ड, शिवाजी महाराज पुतळा, ठिकरूळ नाका, काळंबा मंदिर, समुद्रकिनारा, जे. एस. एम. कॉलेज, कन्या शाळा ज्युनिअर कॉलेज, मारुती नाका येथे चित्ररथ फिरवून व पथनाट्यातून मतदार जनजागृती केली. अलिबाग बस स्टॅण्ड येथे शारदा पोवार यांनी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविला, तसेच सर्वांना 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. या वेळी या कार्यक्रमास मतदार डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तपस्वी गोंधळी, निवडणूक नायब तहसीलदार सुरेखा घुगे, व्हीव्हीपॅट पथक प्रमुख सुदर्शन सावंत, मंडळ अधिकारी जितेंद्र कांबळे, अलिबाग तलाठी वल्लभ मस्के, वेश्वी तलाठी ललिता शिर्के, महिला होमगार्ड सुरक्षिता थळे यांच्यासह  जनसमुदाय उपस्थित होता. स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी या पथनाट्य पथकाचे नेतृत्व करीत आहेत.  या पथनाट्य दौर्‍यामध्ये प्रतीक कोळी, प्रतीक पाटील, प्रसाद अमृते, सौरभ मोरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई, तुषार राऊळ आदी कलाकार सहभागी झाले. चित्ररथाच्या माध्यमातून स्वीप अंतर्गत माझं मत, माझा महाराष्ट्र या माध्यमातून मतदान हा आपला पवित्र हक्क आहे. मतदान अमूल्य दान, दान कोणी विकतं का? मतदान हा मूलभूत हक्क आहे. तो बजावणं आपलं कर्तव्य आहे. 18 वर्षांवरील व्यक्ती ही सज्ञान असते. स्वत: निर्णय घेऊ शकते. कुठल्याही आमिषाला  बळी पडू नका. मतदान ही गुप्त प्रक्रिया आहे. तुम्ही कोणाला मत दिले हे तुमच्याशिवाय कोणालाच कळत नाही, अशा मुद्द्यांवर आधारित पथनाट्ये सादर करण्यात आली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply