कर्जत : बातमीदार
माथेरानकडे येणार्या रस्त्याला क्ले पेव्हरब्लॉक बसविण्यात आले होते, मात्र त्यावरून पाय घसरून घोडे पर्यटकांसह पडण्याच्या घटना घडल्याने त्या रस्त्याच्या उतारावरील क्ले पेव्हर काढले. त्यामुळे माथेरानमधील घोडे पूर्वीप्रमाणे लाल मातीतून चालणार आहेत. माथेरानमध्ये एमएमआरडीएकडून पर्यावरणपूरक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दस्तुरीपासून माथेरानकडे येणार्या रस्त्यावर मातीपासून बनविलेले क्ले पेव्हरब्लॉक बसविण्यात आले. या कामाला दोन महिने उलटत नाही तर सखाराम तुकाराम पॉईंटपासून 200 मीटर अंतरावर असलेल्या उतारावरून घोडे घसरण्याच्या घटना घडल्या. त्यात घोड्याला दुखापतीही झाल्या. घोडेवाल्यांनी ही बाब नगराध्यक्षांच्या कानावर घालवली होती. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी एमएमआरडीएच्या ठेकेदाराने कामदारांच्या मदतीने उतारावरील सर्व क्ले पेव्हरब्लॉक काढून टाकले. त्यामुळे आता या उतारावरून दगडाच्या ओबडधोबड रस्त्यावरून घोडे आणि पर्यटकांना चालावे लागणार आहे.
क्ले पेव्हरब्लॉकमुळे हातरिक्षा ओढणे सोपे जात होते. जास्त जोर लावण्याची गरज पडत नव्हती. आता क्ले पेव्हरब्लॉक काढल्यामुळे आता आम्हाला जास्त ताकद लाऊन हातरिक्षा ओढावी लागणार आहे. तीव्र उताराच्या रस्त्यावरील क्ले पेव्हरब्लॉक काढल्याने पर्यटकांना खड्ड्यातून जावे लागणार आहे.
-प्रकाश सुतार, उपाध्यक्ष, हातरिक्षा संघटना, माथेरान
दस्तुरी-माथेेरान रस्त्यावरील ब्लॉक काही ठिकाणी पाण्यामुळे ओले होत असल्याने त्यावरून घोडे घसरत आहेत. सध्या या रस्त्याचे पेव्हरब्लॉक काढून एका बाजूला हातरिक्षा, हातगाडी, तसेच घोड्यांना चालण्यायोग्य रस्ता कशाप्रकारे करता येईल काय? यासाठी प्राधान्य दिले जाईल.
-प्रेरणा सावंत, नगराध्यक्ष, माथेेरान