कोणताही प्राणी नामशेष होण्यामागे महत्त्वाचं कारण असतं ते वातावरण बदलाचं. मानवप्राणी सोडल्यास बदलत्या वातावरणामुळे आजतागायत अनेक प्राण्याच्या जाती नामशेष झाल्या आहेत, तर काही अगदी दुर्मीळ झाल्या आहेत. पृथ्वीवरील तापमान व वातावरण हे सतत बदलत राहिले आहे व प्राणीदेखील वातावरण बदलांशी मिळतंजुळतं घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. यावर संशोधन करताना अनेक आश्चर्यजनक व मनोरंजक बाबी सामोर्या आल्या आहेत. बदलत्या वातावरणात टिकून राहण्यासाठीच्या त्यांच्या धडपडीविषयी या लेखात जाणून घेऊ.
डार्विनचं ‘ओरिजिन ऑफ द स्पिशीज’ वाचून हर्बर्ट स्पेन्सर या जैवशास्त्रज्ञानं 1864 साली सर्वात पहिल्यांदा ‘सव्र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा वाक्प्रचार वापरला. पुढं डार्विननंदेखील हाच वाक्प्रचार 1869 साली वापरला. युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाच्या संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार पक्षी, उभयचर, सस्तन जलचर व जमिनीवरील प्राणी हे सर्वच वातावरण बदलाशी स्वत:ला अनुरूप असे बदल त्यांच्या शरीरामध्ये घडवून आणत असतात व दर 10 लाख वर्षामागे ते एक डिग्री सेल्शिअस एवढा तापमानातला फरक सहन करण्याची क्षमता त्यांच्यात वाढत असते, परंतु असं म्हटलं जातं की तापमानातील बदल हे प्राण्यांमधील शारीरिक बदलाच्या वेगापेक्षा जास्त वेगवान आहेत. त्यामुळेच काही प्राण्यांचं अस्तित्व हे वातावरणातील तीव्र व हळूहळू होणार्या बदलांमुळे धोक्यात आलेलं आहे. खरं तर सजीवांच्या नामशेष होण्याच्या प्रक्रियेला मोठं कारण हे वातावरण व तापमानातील बदल हेच असतात.
वातावरणाशी जुळवून घेताना एकतर प्राणी शारीरिक संरचनेत बदल तरी घडवून आणतात किंवा ते नामशेष होतात. बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत असताना काही प्राणी-पक्षी स्थलांतर करतात किंवा काही वेळेला त्यांची टिकून राहण्यासाठीची धडपड अयशस्वीदेखील होते. मानवेतर सजीवांना जगण्यासाठी एका विशिष्ट तापमानाची व वातावरणाची गरज असते. मानवाप्रमाणे ते कृत्रिम बदल घडवून आणू शकत नाहीत म्हणूनच हवामान व आजूबाजूच्या वातावरणातील मोठे बदल त्यांच्या नामशेष होण्यासाठी कारणीभूत ठरतात. हे सजीव किती शक्तिशाली आहेत, स्वतःच्या शरीरात व वसतीस्थानात ते कसे बदल घडवतात, त्यांच्या खाण्याच्या व प्रजननाच्या पद्धतीमध्ये काय बदल होतात यावर ते वातावरण व हवामान बदलाशी किती अनुकूलतेने जुळवून घेऊ शकतात हे अवलंबून असतं. समुद्रातील तापमानाचा, पर्वतांवरील हवामानाचा, जमिनीवरील वातावरण बदलांचा, वादळांचा, पावसाच्या प्रमाणाचा, अतिउष्णतेचा, पाण्याच्या व खाद्य उपलब्धतेचा अशा एकूणच जैविक साखळीतील सर्वच घटकांचा सजीवांच्या जीवनचक्रावर लक्षणीय परिणाम होत असतोच. सजीवांची वाढ, प्रजनन व अस्तित्व हे वातावरणावरच बहुतांशी अवलंबून असतं. जसं बेडूक वर्गातील प्राण्यांना शीत तापमानाची गरज असते व तापमान वाढीचा त्यांच्यावर झालेला परिणाम लगेच दिसून येतो. ते विशिष्ट वसतीस्थानातच जगू शकतात व त्यांना अंडी घालण्यासाठी देखील काही विशिष्ट वनस्पतींची तसंच विशिष्ट तापमानाची गरज असते. कोस्टारिकाच्या ढगाळ जंगलांमध्ये राहणारे गोल्डन टोड्स याचं उत्तम उदाहरण आहेत. 1966 साली संशोधकांना हे पहिल्यांदाच दिसले. 1987 साली त्यांची गणना केली तेव्हा ते हजारोंच्या संख्येत होते. 1988 मध्ये त्यांची संख्या अवघी दहा उरली व 1989 मध्ये त्यातला अवघा एकच बेडूक उरला. सोनेरी रंगाचे हे अतिशय सुंदर बेडूक हाहा म्हणता केवळ तीनच वर्षात नामशेष झाले. कारण एल निनोने तिथलं शीत हवामान अधिक उष्ण बनवलं व ही उष्णतावाढ हे गोल्डन टोड्स सहन करू शकले नाहीत. त्यामुळे ते अस्तंगत झाले. असंही म्हटलं जातं की तापमान वाढीमुळे तिथं पसरलेल्या आजारामुळे ही बेडूक जात नष्ट झाली.
काही पक्षी व प्राणी हे तापमानात होणार्या बदलांमुळे स्थलांतर करतात व मूळ वसतीस्थानातलं तापमान त्यांना पाहिजे तसं झालं की हे पक्षी व प्राणी तिथं परत येतात. मात्र या सर्व स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये त्यांना कायमचं वसतीस्थान कधीच सापडत नाही व पर्यायाने ते नामशेष होतात. काही ढणठढङए प्राणी जवळच्याच परिसरामध्ये स्थलांतर करतात. आफिक्रेच्या जंगलांमध्ये अशा प्रकारचं स्थलांतर नेहमी दिसतं किंवा आपल्याकडील वाघ-बिबटेदेखील अशा प्रकारचं स्थलांतर करत असतात. अमेरिकेतील योसेमाईट नॅशनल पार्कमधील आल्पाईन जातीच्या खारी या तिथलं तापमान 3 सेल्शिअसनं वाढल्यावर अधिक उंच ठिकाणी जाऊन राहू लागल्या.
वातावरण व हवामान बदलांशी जुळवून घेताना प्राण्यांची व वनस्पतींची वाढही खुंटलेली अभ्यासात दिसून आली आहे. 65 दशलक्ष वर्षापूर्वी मधमाशा, मुंग्या आदी कीटक हे आतापेक्षा सुमारे 50-75 टक्के अधिक मोठे होते हे त्यांच्या जीवाश्मांच्या पुराव्यावरून सिद्ध झालेलं आहे. सजीवांच्या आकारातील बदल हे फार सूक्ष्म गतीने होत असतात. वनस्पतींचा आकार लहान झाला की त्यावर जगणार्या प्राण्यांना ती अधिक प्रमाणात खावी लागते. यामुळे एकतर ती वनस्पती झपाट्याने नामशेष होते किंवा ती कमी प्रमाणात मिळाल्यामुळे तो प्राणी तरी नामशेष होतो. पर्यायाने त्या शाकाहारी प्राण्यावर जगणार्या मांसाहारी प्राण्याचं खाद्यही कमी होतं. अशा प्रकारे तीन सजीवांच्या नामशेष होण्याचा धोका उद्भवतो.
मेक्सिको व कॅलिफोर्नियामध्ये आढळणार्या क्वीनो चेकरस्पॉट या फुलपाखरानं स्वत:ला वाचवण्यासाठी अधिक उंच ठिकाणी स्थलांतर केलं तसंच स्वत:चं खाद्यही बदललं असं साऊथहॅम्पनच्या बटरफ्लाय कन्झर्वेशन सिम्पोसिअमच्या तज्ज्ञांना आढळलं आहे.
काही प्राणी त्यांच्याच दुसर्या प्रजातीशी संकर घडवून आणतात. जगातील शार्क माशांचा पहिला अशा प्रकारचा संकर हा ऑस्ट्रेलियातील समुद्रात आढळला आहे. ऑस्ट्रेलियन ब्लॅकटीप व कॉमन ब्लॅकटीप या दोन शार्क माशांच्या संकरातून निर्माण झालेले शार्क तिथे आढळतात. आता या माशांनी नक्की कोणत्या कारणासाठी संकर केला असावा याचं कारण संशोधक शोधत आहेत, पण त्यामागे समुद्रातील तापमान वाढ हे कारण असण्याची शक्यता आहे. कारण हे हायब्रीड शार्क अधिक उष्णता सहन करू शकतात, तर त्याच्या मूळ प्रजातींना थंड पाण्याची सवय आहे.
युरोपिअन वॅस्प स्पायडर जातीच्या कोळ्याने तर स्वतःच्या गुणसूत्रांमध्येच बदल घडवून आणल्याचं संशोधकांना आढळलं. तर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक स्टीव्ह पालुम्बी यांनी काही प्रकारची प्रवाळं ही पाणी गरजेपेक्षा अधिक उष्ण वाटत असेल तर त्यांच्या गुणसूत्रांनाच ऑन व ऑफ करतात असं सिद्ध केलं आहे. काही काळानं हवं तसं तापमान झाल्यावर प्रवाळाचं ऑफ असलेलं गुणसूत्र पुन्हा कार्यरत होतं.
ऑरेंज स्पॉटेड फाईलफिश हे जपानच्या समुद्रातील मासे तापमान वाढल्यामुळे 1988च्या सुमारास नष्ट झाले. टुंड्रा प्रदेशातील जंगल कमी होत असल्यामुळे तेथील कॅरिबू हरणं, आक्टक्ट फॉक्स, स्नोई आऊल यांची संख्या कमी होत आहे. दक्षिण आफ्रिका व नामिबियात आढळणारी क्विव्हर झाडं, पोलर बेअर, अॅडेल पेंग्विन, नॉर्थ अटलांटिक कॉड, गंगेत आढळणारे इरावडी डॉल्फिन असे कित्येक प्राणी व वनस्पती हवामान बदलाला बळी पडलेले आहेत. समुद्राच्या पाण्याची पातळी व तापमान वाढल्यामुळे कासवांच्याही प्रजननावर परिणाम होत आहे. त्यांना अंडी घालण्यासाठी पुरेसा सुरक्षित किनारा मिळत नाही. याबाबत कोकणातील सह्याद्री मित्रमंडळसारख्या काही संस्था कासव संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.
एकूणच नैसर्गिक व मानवनिर्मित कारणांमुळे वातावरणात बदल घडताहेत. ज्यांचा परिणाम सजीवांवर दिसून येतो. हा परिणाम त्यांची जैवसाखळी व खाद्यसाखळी तुटणे, वसतीस्थान तुटणे, आयुमर्यादा कमी होणे, प्रजननावर परिणाम, शारीरिक बदल, पूर्णपणे नामशेष होणं अशा अनेक स्वरूपात दिसून येतो.