मालमत्ता करात 47 टक्के सवलत
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या सन 2021-22च्या सुमारे 783 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला बुधवारी (दि. 24) झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये मालमत्ता करामध्ये वार्षिक भाडेमूल्याच्या 30 टक्के सूट व 17 टक्के सवलत अशा एकूण 47 टक्के सवलतीला या वेळी मंजुरी देण्यात आली.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची 24 मार्च रोजी झालेली सभा सन 2021-22च्या अंदाजपत्रकाबाबत पूर्ण महिती घेऊन सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी स्थगित करण्यात आली होती. ही सभा बुधवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 11.30 वाजता अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, सदस्य प्रकाश बिनेदार, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, निलेश बाविस्कर, महादेव मधे, संतोष भोईर, उपायुक्त विठ्ठल डाके, गणेश शेटे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावाडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकटे, लेखापरीक्षक विनयकुमार पाटील, लेखापाल सुनील मानकामे आदी उपस्थित होते.
महापालिकेने 2021-22च्या अंदाजपत्रकात मालमत्ता करामध्ये वार्षिक भाडेमूल्याच्या 30 टक्के सूट दिली आहे. याशिवाय 31 जुलैपर्यंत कर भरणार्याला आणखी 10 टक्के, 30 दिवसांत भरणार्याला आणखी पाच टक्के व ऑनलाइन भरणार्याला दोन टक्के सवलत अशी एकूण 47 टक्के सूट देण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय महापालिकेने या अंदाजपत्रकात घेतले आहेत. चारही प्रभागांच्या कार्यालयाची बांधकामे करणे, सिडकोकडून प्राप्त होणार्या उद्याने, दैनिक बाजार, खुल्या जागा यांची विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 52 शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर इमारती दुरुस्ती, बांधकाम यांच्यावरील खर्चासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांसाठीचे निश्चित धोरण आखण्यात आले असून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी पुरेशी तरतूद जमा व खर्चाच्या अंदाजात प्रस्तावित करण्यात आली आहे. या सभेत अंदाजपत्रकावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यात आली.