आरटीआयमधून धक्कादायक खुलासा
मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडात लोकांनी भरघोस देणगी दिली, मात्र कोविडग्रस्तांना यातून संपूर्ण मदत करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीचा अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात महाराष्ट्र मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडमध्ये सुमारे 799 कोटी रुपये जमा झाले. लोकांनी मोठ्या प्रमाणात दिलेल्या रकमेपैकी केवळ 24 टक्के रक्कम खर्च झाली. या निधीत सुमारे 606.3 कोटी रुपये अद्याप जमा आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड निवारणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन नागरिकांना केले होते. यात मोठ्या प्रमाणात लोकांनी पैसे दान केले. महाराष्ट्र मुख्यमंत्री कोविड-19 रिलीफ फंड अंतर्गत निधी 799 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो सहा महिन्यांपूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. आरटीआय कायद्यांतर्गत निधीमध्ये जमा केलेल्या आणि खर्च केलेल्या एकूण रकमेचा तपशील मिळवल्यानंतर कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारने फक्त 192 कोटी रुपये म्हणेज 24 टक्के निधीचे वितरण केल्याचे म्हटले आहे.
गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महापालिकेच्या आणि इतर सरकारी रुग्णालयांमध्ये दिल्या जाणार्या आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कोविड निधी वापरावा, अशी मागणी केली आहे. राज्याने आता नवीन देणग्या घेणे थांबवले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.