‘अ स्टार इज बॉर्न’ चित्रपटातील ‘शॅलो’ या गाण्यासाठी लेडी गागाला ऑस्करचा ‘बेस्ट ओरिजनल साँग’साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ऑस्करबरोबरच हॉलीवूडमध्ये मानाचे समजले जाणारे ग्रॅमी, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब हे पुरस्कारही यंदा तिनं पटकावले आहेत. त्यामुळे एकाच वर्षात हॉलीवूडमधील सर्वच मानाचे पुरस्कार जिंकणारी ती पहिली पार्श्वगायिका ठरली आहे. ‘अ स्टार इज बॉर्न’ या चित्रपटातील ‘शॅलो’ हे गाणं लेडी गागानं गायलं आहे. मंत्रमुग्ध करणारं संगीत आणि उत्तम पार्श्वगायनामुळे सर्वत्र या गाण्याचे कौतुक होत आहे. ऑस्करच्या व्यासपीठावरही या गाण्याचं भरपूर कौतुक झालं. लेडी गागाचे मूळ नाव स्टीफनी जोआन अँजेलिना जर्मानोटा असे आहे. मध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंबात जन्मलेल्या स्टीफनीने 17व्या वर्षीच पारंपरिक शिक्षणापासून फारकत घेतली. न्यूयॉर्कमध्ये कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन संगीत नाटकांमध्ये काही काळ घालविला. तेथेच एक रॉक बँड स्थापन करून जेमतेम 10-20 श्रोत्यांसमोर आपल्या गाण्यातली उमेदवारी केली. या काळात तिने रॉकस्टार बनण्याचा निर्धार केला. खर्चासाठी एक वर्ष पुरतील इतके पैसे वडिलांकडून घेऊन ती अतिशय बजेट भाड्याच्या खोल्यांमधून काटकसरीने राहिली. रॉकस्टार बनण्यासाठी सौंदर्य, कमनीय देह इत्यादी वैशिष्ट्ये नसली, तरीही आत्मविश्वास, शब्दसंपदा आणि खणखणीत आवाज यांची तिच्याकडे कमतरता नव्हती. सुरुवातीला इतर पॉपस्टारसाठी गाणी लिहिता लिहिता तिला आपल्या आवाजातले गाणे श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली. युट्यूब, सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर जगणार्या पिढीने लेडी गागाची खासियत कानोकानी पोहोचविली. तिच्या गाण्यावर इ.स. 1980-90 च्या दशकातील इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव आहे. शब्द हे खास शस्त्र बनून, सरधोपट नसलेल्या शैलीतून येणारे असल्याने लेडी गागाने मायकेल जॅक्सन, मॅडोना या दिग्गज कलाकारांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच कमावून दाखविली. ग्रॅमीसोबत सर्व संगीत सन्मान पटकावणार्या, प्रभावशाली व्यक्तींमधील अग्रस्थान गाठणार्या गागाकडे या शतकातील सर्वांत बुद्धिमान गायिका म्हणून पाहता येईल.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …