Breaking News

एसटी संपाचा तिढा कायम

सरकारकडून पगारवाढ; कर्मचारी मात्र विलिनीकरणावर ठाम

मुंबई ः प्रतिनिधी
गेले अनेक दिवस सुरू असलेल्या संपाची राज्य सरकारने दखल घेत अंतरिम पगारवाढ केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी (दि. 24) पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. सध्या एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची बाब ही उच्च न्यायालयाच्या समितीसमोर असल्याने तो निर्णय तातडीने घेता येणे शक्य नसल्याचे त्यांनी या वेळी म्हटले, मात्र बहुतांश एसटी कर्मचारी विलिनीकरणावर ठाम आहेत.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेला परिवहनमंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते.
या वेळी अनिल परब म्हणाले की, सध्या आम्ही कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार. जे कर्मचारी 1 वर्षे 10 वर्षे सेवा देत आहेत त्यांचा पाच हजार रुपये पगार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 ते 20 वर्षांपर्यंतच्या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तगर 20 वर्षे आणि त्याहून अधिक कर्मचार्‍यांच्या पगारात दोन हजार पाचशे रुपयांनी केली आहे. इतर भत्तेदेखील सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच मिळणार आहे. एसटीचे उत्पन्न वाढले तर कामगारांना प्रोत्साहन म्हणून इन्सेटिव्ह दिले जाईल. एसटीचा पगार यापुढे 10 तारखेच्या आत होईल याची हमी राज्य सरकाने घेतली आहे.
‘कर्मचार्‍यांशी चर्चा करून आज भूमिका जाहीर करणार’

राज्य शासनाने एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटावा यासाठी त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर एसटी कर्मचार्‍यांचे शिष्टमंडळ म्हणून सरकारसोबत चर्चेला गेलेले नेते आमदार सदाभाऊ खोत आणि  आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानात जाऊन कर्मचार्‍यांची भेट घेतली. या वेळी कर्मचार्‍यांशी चर्चा करून उद्या म्हणजेच गुरुवार (दि. 25) सकाळपर्यंत कर्मचार्‍यांची भूमिका जाहीर करू, अशी माहिती या नेत्यांनी दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply