Breaking News

एसटी कर्मचारी विलिनीकरणावर अजूनही ठाम

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांसाठी पगारवाढीची घोषणा करूनही कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचार्‍यांना पाठिंबा देणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाबाबतचा यापुढील निर्णय एसटी कर्मचारीच घेतील, असे सांगून त्यांना गुरुवारी (दि. 25) शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचार्‍यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज त्यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी निर्णय जाहीर केला.
विलिनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे, पण सरकार दोन पावले पुढे आले आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला, तर त्यात कामगारांसोबत आम्ही उभे राहू. राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय कर्मचार्‍यांनी घ्यायचा आहे. त्यात आम्ही कर्मचार्‍यांसोबत असू, असे देखील सदाभाऊ खोत म्हणाले.
कर्मचार्‍यांनी हे आंदोलन उभे केले होते. आम्ही आझाद मैदानात त्यांना घेऊन आलो होतो. आम्ही तात्पुरते आझाद मैदानातले आंदोलन मागे घेतले आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. कामगारांनी हे आंदोलन उभे केले होते. त्यामुळे त्यांनी याबाबतचा पुढचा निर्णय घ्यायचा आहे. कामगारांना न्याय मिळावा हा आमचा हेतू होता. आंदोलकांनी पुढे आंदोलन सुरू ठेवले, तर त्याला आमचा पाठिंबा असेल, असे या वेळी सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.
हा राज्याच्या इतिहासातला कामगारांनी स्वत: उभ्या केलेल्या संपातला एक मोठा विजय आहे. खर्‍या अर्थाने हा निर्णय कामगारांचे मोठे यश आहे. पहिल्या टप्प्यातला हा विजय आहे. भविष्यात विलिनीकरणाची लढाई सुरूच ठेवायची आहे. कामगारांच्या संपाला राज्यातल्या जनतेची मोठ्या प्रमाणात सहानुभूती लाभली होती. शासकीय कर्मचारी आणि एसटी कामगार यांच्यातली तफावत सरकारला दूर करावी लागेल. आम्ही दोघे आमदार एसटी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात त्यांची बाजू मांडत राहणार आहोत, असे सदाभाऊ खोत यांनी या वेळी सांगितले.
संपाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत करताहेत. आम्ही भाजपचे आमदार म्हणून संपात सहभागी झालेलो नाही. एसटी कर्मचार्‍यांच्या मुद्द्यावर आंदोलनाला आम्ही आझाद मैदानावर सुरुवात केली. कर्मचार्‍यांना तिथे यायचे आवाहन केले. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी तिथे दाखल झाले, पण विलिनीकरणाचा निर्णय येईपर्यंत संप तसाच सुरू ठेवणे शक्य नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply