पनवेल ः रामप्रहर वृत्त
मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बँका, तसेच पतपेढीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांच्या सुचनेनुसार केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्यास ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे, मात्र सर्वच ज्येष्ठ नागरिक तसेच महिलावर्गाला ऑनलाइन पद्धतीचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे वेळेवर कर भरण्यास त्यांना अडचणी येत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असावा यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे आपली सूचनावजा समस्या मांडली होती. त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 22) आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन नागरिकांची ही गैरसोय त्यांच्यासमोर मांडली. वीज किंवा इतर देयक भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया असते, मात्र तेथेही अनेक वीज ग्राहकांना देयक भरता येत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने बँका तसेच पतपेढ्यांना तसा अधिकार दिला आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता कर भरण्यास बँका व पतसंस्थेमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्यास वेळेवर कर भरणा करण्यास मदत होणार आहे व त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी यावर सहमती दर्शवत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे ज्यांना ऑनलाइन कर देयक भरता येणार नाही अशा मालमत्ताधारकांना हा एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.