Breaking News

आला भारतीय गुंतवणूकदारांच्या कसोटीचा काळ!

शेअर बाजारातील गुंतवणूक मार्ग अनेक भारतीय नवे गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, म्हणूनच परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेत असतानाही बाजार मात्र पुन्हा वर जाताना दिसतो आहे, पण तो दोलायमान झाल्याचेही पाहायला मिळते आहे. याचा अर्थ अशा नव्या गुंतवणूकदारांची ही खरी कसोटी असून त्यात पास होण्यासाठी बाजारात थांबण्यासाठी खंबीरपणा अंगी बाणण्याची गरज आहे.

मागील एक दोन आठवड्यात आपल्या बाजारानं दोलायमान परिस्थिती अनुभवली. सेन्सेक्स आपल्या सर्वोच्च पातळीवरून (म्हणजेच 62245) 5800 अंशांची गटांगळी खाऊन 56383ची पातळी गाठून आला. वरवर पाहता, हा भाव-सुधार जरी 10 टक्क्यांच्या आतच असला तरी निर्देशांकांमधील काही शेअर्स 15 टक्क्यांपर्यंत, तर व्यापक आधार असलेल्या बीएसई 500 मधील काही चांगल्या कंपन्यांचे शेअरभाव 25 टक्क्यांपर्यंत घसरलेले दिसले. सध्या बाजाराला काळ सुधार व भाव सुधार करण्यासाठी कारण हवं आहे आणि सध्या तशी अनेक कारणे आहेत.  नव्या कोरोना व्हेरिएंटची असलेली धाकधूक, जगभरात असलेली चलनवाढीची भिती व त्यामुळं अमेरिका कडक पतधोरण अवलंबण्याची शक्यता आणि त्यातच युक्रेनवरून अमेरिका व रशिया यांच्यामधील तणाव. अशी परिस्थिती असताना आंतरराष्ट्रीय बाजार दोलायमान न राहिल्यासच नवल. त्यात भारतीय बाजार नेहमीच सुरुवातीस त्याची री ओढताना दिसतो. बाजारात करेक्शन येण्याचं साधं कारण म्हणजे शेअर किंमती त्यांच्या मूलभूत गोष्टींपेक्षा किंचित वाढलेल्या होत्या आणि मागील एक-दीड वर्ष अविरत सुसाट धावणारी ट्रेन थांबलेली आहे, खरंतर तिनं थोडी उलटी दिशा घेतली आहे जेणेकरून मागील सुटलेल्या प्लॅटफॉर्मवरील उभे असलेले लोक पुन्हा ट्रेनमध्ये चढू शकतील.

मागील महिन्याभरात अनेक लोकांचे मला माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेस आले आणि ज्याचा एकूण आशय होता- पोर्टफोलिओ मधील शेअर्सची विक्री करून नफा निश्चित करावा की थांबावं अथवा नवीन कोणते शेअर्स घेणं हितावह राहील इत्यादी. तेजीमध्ये अति-आत्मविश्वासी असलेले गुंतवणूकदार बाजारातील प्रत्येक पडझडीनंतर मग ती छोटी असो वा मोठी, हवालदिल होतात. अशा परिस्थितीत काही मुद्द्यांकडं लक्ष देणं गरजेचं ठरतं.

जोखीम कोणी घ्यावी?

नुकसानीमुळं तुमच्या जगण्याला धोका निर्माण होत नसेल आणि तुम्हाला भविष्यातील अतिरिक्त नफ्याची गरज असेल तरच तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपण काही मिस्टर मार्केट नाही आणि ना ही बाजार आपल्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणं भूतकाळातील किंवा भविष्यातील बाजारातील दीर्घकालीन परतावा मिळवणे आपल्या नियंत्रणात नाहीतर आमची जोखीम व्यवस्थापित करणे आणि नासाडी टाळणे ह्याच गोष्टी प्रामुख्यानं आपल्या हातात आहेत. बाजार हा परम श्रेष्ठच आहे आणि आपण त्याला हरवायच्या फंदात पडू नये. येथील गुंतवणुकीबाबत कोणतीही खात्री नसते आणि परतावा हा कदापि निश्चित नसतो या मूलभूत गोष्टी लक्षात घेऊनच प्रवेश घ्यावा. त्यामुळं शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी जर प्रत्येकाचा विचार निश्चित असेल तर 10-20 टक्क्यांच्या भाव-दुरुस्तीनंतरदेखील आपल्या गुंतवणुकीबाबत आपण निश्चित राहण्यास शिकलं पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम गुंतवणुकीतून ध्येयनिश्चिती केली पाहिजे. शेअरबाजारात कमीत कमी पाच वर्षे तरी गृहीत धरून तुमची गुंतवणूक केली गेलेली पाहिजे, याचा अर्थ पाच वर्षांत बाजारानं कितीही हेलकावे घेतले तरी सरतेशेवटी बाजार पुन्हा तेजी पकडेल आणि चांगल्या खरेदी केलेल्या कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देतीलही अपेक्षा.. अर्थातच तुम्ही निवडलेली कालमर्यादा तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळलेली असावी आणि त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर कोणताच फरक पडू नये.

सल्लागाराची गरज आहेच!

आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात म्हणजे, तरुणपण, प्रौढावस्था, पालकत्व, वार्धक्य अशांमध्ये तुमच्या जोखीम प्रोफाइलचे विश्लेषण करा. तुमचे वय, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जबाबदार्‍या आणि अशा बर्‍याच काही गोष्टी तुमची जोखीम स्वीकारण्याची कुवत बदलवतात. त्यामुळं तुमची बाजारातील कंपनी निवडदेखील बदलू शकते. जसे की, आक्रमककेतला मुरड घालून जास्त बचावात्मक धोरण अवलंबवावं लागू शकतं (Aggressive to Defensive). नक्कीच त्यामुळं मालमत्ता वर्गीकरणांत बदल करावा लागतो. जर तुमची एखादी गुंतवणूक खराब कामगिरी करत असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की त्यातून चांगला परतावा मिळणार नाही. फक्त त्यासाठी तुमची मानसिक व व्यवहारिकरीत्या थांबण्याची तयारी असली पाहिजे.

ज्याप्रमाणं प्रवासात असताना आपण आपले सगळेच पैसे एकाच ठिकाणी न ठेवता ते विखरून ठेवतो, अगदी त्याचप्रमाणं सर्वच्या सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी न करता विविध पर्यायात केली गेली पाहिजे. अर्थातच यासाठी तुमच्या दिमतीस एक उत्तम विश्वासू असा अनुभवी आर्थिक सल्लागार असावा. ज्यास तुमच्या आर्थिक गोष्टींची व तुमच्या कौटुंबिक जबाबदारीची पूर्ण कल्पना असली पाहिजे. म्हणूनच मित्राला सल्लागार न बनवता सल्लागारास मित्र करा..

स्थिर, बचावात्मक असे काही आहे?

आज, 1950 आणि 60च्या दशकाच्या विपरीत, प्रत्येक गोष्ट दररोज बदलताना दिसते. विशेषत: अशा कंपनीचा किंवा उद्योगाचा विचार करणं कठीण आहे जी एकतर इतर कंपन्यांना उद्ध्वस्त करू शकेल किंवा पुढील वर्षांत स्वतः उद्ध्वस्त होऊ शकेल (किंवा दोन्ही). आजच्या आघाडीच्या वाढीव कंपन्यांच्या यादीतील सर्व कंपन्या पाच किंवा दहा वर्षांत टिकून राहतील याची खात्री बाळगताना प्रश्न पडतो. त्यामुळं, स्थिर व बचावात्मक सारखे शब्द भविष्यात कमी असतील आणि बर्‍याच गुंतवणुकीसाठी पूर्वीपेक्षा जास्त तांत्रिक कौशल्य आवश्यक ठरू शकेल आणि त्यामुळं भविष्यातील गुंतवणूक आधीच्या गृहीतकांवर किंवा मागील कामगिरीच्या अनुषंगानं असल्यास अशा गृहीतकांवर केलेली गुंतवणूक छाननीच्या अधीन असणं आवश्यक आहे. उदा. सध्या फिनटेक कंपन्या भांडवली बाजारात प्रवेश करत आहेत; त्यामुळं सध्याच्या व्यवस्थेत व्यत्यय आणण्यास त्या सक्षम आहेत आणि त्यामुळं हे मॉडेल बँकांच्या डोक्यावर बसत आहे जे आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांना शोधून त्यांना आकर्षित करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत व मिळालेले ग्राहक टिकवूनदेखील ठेवण्यात त्यांना यश येत आहे. त्यामुळं प्रश्न आहे की, बँका कर्ज देण्याच्या आणि कर्ज घेण्याच्या व्यवसायात राहतील की त्यांच्या ग्राहकांचे नियंत्रण अशा प्रकारच्या

फिनटेककडं सोपवून देतील?

फिनटेक व बँकांची स्पर्धा

महागाईचा मुद्दा – सध्या आपल्या देशाचा विचार केल्यास भारतीय रिझर्व्ह बँक ही अनेक आघाड्यांवर टिच्चून यशस्वीरित्या लढत आहे. वाढ, चलनवाढ, व्याजदर, सरकारचा कर्ज घेण्याचा कार्यक्रम, परकीय चलन बाजारातून मोठ्या प्रमाणावर येणारा ओघ आणि रुपयाचं उचित मूल्य व्यवस्थापन करत आहेत आणि त्यामुळंच आज देशातील महागाई दर हा अमेरिकेपेक्षा कमीच आहे. त्यामुळं महागाईच्या मुद्द्याचा फारसा बाऊ करण्याची गरज नाही असं मला वाटतं. दुसरा मुद्दा असा की, अनेक कंपन्यांनी स्वतःचे कर्ज संपूर्ण वापरल्यामुळं बँकांची पत वाढ खुंटली आहे. बँका भांडवली खर्चाचं चक्र सुरू होण्याची वाट पाहत आहेत, जिथं कंपन्या बँकांकडून कर्ज घेण्यास सुरुवात करतील पण त्याची शक्यता सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा, दुसर्‍या लॉकडाऊननंतर पूर्ववत सुरळीत होणारा मागणी-पुरवठा आणि पुरवठा साखळीचं सक्षमीकरण यांच्यावर अवलंबून आहे, जे कदाचित पुढील दोन किंवा तीन तिमाहीत होईल. जसजसे क्रेडिट वाढीचे आकडे सुधारू लागतील तसतशी बँकांची कामगिरी सुधारेल असा अंदाज आहे. याठिकाणी फिनटेक व बँका जोखल्या जातील. जे फिनटेक, जास्त पत जोखीम (क्रेडिट रिस्क) घेत आहेत त्यांना पुढं जाऊन जास्त बुडीत खात्यांचा सामना करावा लागू शकतो.

काळजीचे कारण नाही!

परदेशी गुंतवणूकदारांनी लावलेला विक्रीचा सपाटा- या महिन्यातील आठ दिवसांत 16 हजार कोटी रुपयांची विक्री केलेली आहे, तर मागील नोव्हेंबर महिन्यातील हाच आकडा जवळपास 40 हजार कोटी रुपये आहे. ही कृती अमेरिकेतील बाँड खरेदीमध्ये कपात करण्याच्या कारणावरून असू शकते, परंतु अशी कटौती आपल्यासाठी विषेश चिंतेची बाब नसून आज भारत हा अशा देशांपैकी आहे जिथं परकीय चलन साठा (640.40 अब्ज अमेरिकी डॉलर्स) परकीय चलन कर्जापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे 2013 प्रमाणं भारतीय बाजारावर अशा प्रकारचा परिणाम होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं एकच सांगावसं वाटतं, बाजारातील भूलथापांना बळी पडत उतू नका मातू नका आणि गुंतवणुकीचा घेतलेला वसा टाकू नका.

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply