Breaking News

सावध रहा, सुरक्षित रहा!

देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असताना दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण मात्र हळहळू वाढत आहेत. त्याची गती तीव्र नसली तरी याच ओमायक्रॉनमुळे काही देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आलेली आहे. म्हणूनच केंद्रीय यंत्रणेने देशातील नागरिकांना सावध करतानाच इशाराही दिला आहे.

आतापर्यंत जगातील 57 देशांमध्ये पोहचलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन हा अल्फा, डेल्टापेक्षा अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. अतिशय वेगाने पसरणार्‍या या नव्या विषाणूची 30हून अधिक म्युटेशन आहेत, असेही जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. अर्थात, तो किती परिणामकारक आहे याबद्दल गोंधळ कायम आहे. याआधी जेव्हा कोरोनाचा जेव्हा पहिल्यांदा प्रादुर्भाव झाला तेव्हाही कुणाला या महामारीबाबत नेमकेपणाने सांगता आले नव्हते, पण याच गडबडीत कोरोनाने अवघ्या जगाला कधी विळखा घातला हे कळलेदेखील नाही. हा हा म्हणता अगदी वार्‍यापेक्षा जलद गतीने कोविड-19ने अवघे जग आपल्या कवेत घेतले आणि होत्याचे नव्हते झाले. त्या कटू आठवणी ताज्याच आहेत. यंदाही वर्ष सरताना नव्या विषाणूने धास्ती निर्माण केली आहे. या विषाणूचा दक्षिण आफ्रिकेतील उगम आणि तिथून सर्वप्रथम तो जिथे आढळला अशा देशांमध्ये प्रवासी हवाई वाहतुकीस अनेक देशांनी बंदी घातली आहे. भारतानेही खबदारी म्हणून नियमित हवाई वाहतूक 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील ओमायक्रॉनबाधित रुग्ण सर्वत्र आढळत आहेत. आपल्या देशात कोविड-19 विषाणूमुळे बाधित होणार्‍या रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूचा आकडा त्या तुलनेत एमदम खाली उतरलेला नाहीए. अशात ओमायक्रॉन डोक वर काढू लागला आहे. सुरुवातीला ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले होते. त्यानंतर आता इतर ठिकाणीही या नव्या विषाणूने हात पाय पसरवायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे इतर ठिकाणीही अशा रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. ही संख्या सध्या कमी वाटते, पण याच ओमायक्रॉनने ब्रिटन, फ्रान्समध्ये नव्या लाटेला निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून शासकीय यंत्रणेकडून नव्या नियमावली लागू करण्यात येत आहेत. शासन-प्रशासन त्यांच्या बाजूने कार्यवाही करीतच आहे, पण नागरिकांनीही सामाजिक भान बाळगणे आवश्यक आहे. आपण पाहतो हल्ली कोरोनासंबंधी नियमांना सर्रास हरताळ फासला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी दिसून येते. मास्क बांधण्यासही कुचराई केली जाते. लसीकरणामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी अशा प्रकारे बेफिकीरपणे वागल्यास पुन्हा संकट येण्यास वेळ लागणार नाही. वेळ काही सांगून येत नाही हे दोनदा सर्वांनी अनुभवले आहे. तरीही अनेक जण सुधारायला तयार नाहीत. मास्क आणि लस दोन्ही आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षित अंतर राखणेही काळाची गरज आहे. ओमायक्रॉनचा जागतिक पातळीवर वेगाने होणारा प्रसार चिंता वाढवणारा आहे. आपल्याकडेही तशी परिस्थिती उद्भवल्यास निर्बंध लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्याचा त्रास सर्वांनाच होईल. तसे होऊ नये असे वाटत असल्यास स्वत: सावध राहून सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षितपणे जीवन जगू द्या एवढेच सांगणे आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply