अलिबाग : जिमाका
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे शनिवारी (दि. 11) अलिबाग येथे झालेल्या लोकन्यायालयात तब्बल 15 हजार 300 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात आली आहे. रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण 16 कोटी 74 लाख 77 हजार 089 रुपये मूल्य असलेली एक लाख दोन हजार 250 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व प्रलंबित प्रकरणांपैकी 6 कोटी 98 लाख 91 हजार 776 रुपये मूल्य असलेली 14 हजार 425 प्रकरणे, तसेच दाखल प्रकरणापैकी नऊ कोटी 75 लाख 85 हजार 313 रुपये मूल्य असलेली 875 प्रकरणे अशी एकूण एक लाख दोन हजार 250 पैकी 15,300 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली व त्यातून पक्षकारांना एकूण 16 कोटी 74 लाख 77 हजार 089 रूपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली. रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयात लोक अदालती कक्ष स्थापन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करूनदेखील काही प्रकरणे मिटविण्यात आली. हे लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच विधीज्ञ आणि सर्व पक्षकारांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे व विधी प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.