Breaking News

कोरोनासंबंधी दिशानिर्देश

वैश्विक महामारी कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन देशात पोहचलेला असून आपले हातपाय पसरत आहे. ही संख्या सुरुवातीला नगण्य होती, पण हळूहळू आकडा वाढतोय. कोरोनाचा पूर्वानुभव पाहता केंद्र सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळेच केंद्राने राज्यांना नव्याने दिशानिर्देश देऊन अलर्ट केलेले आहे. वर्ष संपायला आले आणि कोरोनारूपी संकट पुन्हा एकदा आपला विळखा मानवाभोवती आवळू पाहतोय. अल्फा, डेल्टानंतर आता ओमायक्रॉनचा संसर्ग जगात सर्वदूर पसरू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेतून निर्माण झालेला हा नवा विषाणू घातक असून त्याच्या प्रादुर्भावाचा वेग आधीच्या विषाणूंपेक्षा जास्त आहे. म्हणूनच चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाने महासत्ता म्हणवणारे देश अमेरिका, ब्रिटन यांची वाताहत केली. प्रत्येक देशाला या महामारीची झळ बसली. भारतातही कोरोनाने दुसर्‍या लाटेत धुमाकूळ घातला होता. त्यानंतर इतर काही देशांमध्ये कोरोनाची मूळे घट्ट असताना आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यानंतर कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले आहे. अपवादात्मक स्थितीत समूह संसर्ग दिसून येतो. परिस्थिती चांगली असली तरी ज्या पद्धतीने काही लोक बेफिकीरपणे वागत आहेत ते पाहता नव-नव्या विषाणूंच्या फैलावास आमंत्रण मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सतर्क असून ते वेळोवेळी नागरिकांना आपल्या विविध यंत्रणांमार्फत सावध आणि सुरक्षित राहाण्यास सूचित करीत आहेत, जेणेकरून ही आपत्ती पुन्हा आपल्याकडून प्रकोप करू नये. एकेक करून देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. गंभीर बाब म्हणजे प्रवासाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या नव्या विषाणूने लोक बाधित होत असल्याचे आढळत आहे. आतापर्यंत सुमारे 14 राज्यांमध्ये 220हून अधिक जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्ली आघाडीवर आहे. नवीन विषाणूबाधितांची संख्या हळूहळू वाढत असली तरी लोक बिनधास्त आहेत. ते लक्षात घेऊन नवीन गाईडलाइन जारी करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यांना दिशानिर्देश देत परिस्थिती पाहून नाईट कर्फ्यू आणि कंटेन्मेंट झोनसारखे उपाय करण्यासाठी अलर्ट रहावे, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनसाठी वॉर रूम तयार करण्याचेही निर्देश दिले गेले आहेत. विशेषकरून ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लग्न सोहळ्यातील, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखावी लागेल. अंत्यसंस्कारासाठीही उपस्थित राहण्यास मर्यादा आवश्यक आहे. याशिवाय कार्यालये, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकीची साधने, शाळा-महाविद्यालयांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल. कोरोनाचा आतापर्यंतचा प्रवास पाहता तो लगेचच व समूळ नष्ट होईल असे दिसत नाही. त्यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच मास्क, सामाजिक अंतर आणि स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर येत्या काळातही कायम ठेवावा लागणार आहे. मुख्य म्हणजे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे काळाची गरज आहे. अनेकांनी कोरोनाची लस घेतलेली आहे, पण अजूनही याबाबत काही लोकांमध्ये भीती, असुरक्षितता, अज्ञान आहे. त्यांचे जवळच्यांनी प्रबोधन करून त्यांनाही लस घेण्यास तयार केले पाहिजे. आपल्या देशात कोरोना जो आटोक्यात दिसत आहे त्याला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply