Breaking News

परभणी, सांगली विजेते

किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा

परभणी ः प्रतिनिधी

यजमान परभणी आणि सांगली यांनी 32व्या किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. दोन्ही अंतिम सामने शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळले गेले.

परभणीतील पाथरी येथील कबड्डी महर्षी बुवा साळवी क्रीडानगरीत झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात परभणीने नंदूरबारचे कडवे आव्हान 30-25 असे परतवून लावत प्रभाकर नागू पाटील चषकावर आपले नाव कोरले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत नंदूरबारने शेवटच्या काही मिनिटांपर्यंत आपल्याकडे आघाडी टिकवण्यात यश मिळविले होते, पण शेवटी त्यांचा संयम सुटला आणि नंदूरबारला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या क्षणी त्यांच्यावर पडलेल्या लोणमुळेदेखील ते पराभवाच्या गर्तेत गेले. परभणीकडून चढाई करताना त्यांच्या अंकुश भांडे याने एक बोनस गुण व 11 झटापटीचे असे 12 गुण मिळविले. रोहन आडेने तीन पकडी करीत त्याला उत्तम साथ दिली. नंदुरबारकडून 21 चढाया करताना चार बोनस व 10 झटापटीचे अशा 14 गुणांची कमाई केली. त्याला रोहन वाळोकरने तीन पकडी करीत उत्तम साथ दिली, पण संघाला मात्र ते पराभवापासून वाचवू शकले नाहीत.

मुलींच्या अंतिम सामन्यात सांगलीने अतिशय चुरशीच्या लढतीत पुण्याचा प्रतिकार 26-24 असा मोडून काढत चंदन पांडे फिरता चषक आपल्या नावे केला. एका तपाच्या कालावधीनंतर सांगलीने किशोरी गटात ही किमया साधली. याचे सारे श्रेय छोट्या चणीच्या व किरकोळ बांध्याच्या श्रावणी भोसले हिला जाते. तिने आपल्या लयबद्ध व चमकदार चढाईने परभणीकर कबड्डी रसिकांची मने जिंकली. तिने पूर्ण सामन्यात 16 चढाया केल्या. त्यात तिने तीन बोनस व 11 झटापटीचे असे एकूण 14 गुण मिळविले. नम्रता सावंतनेदेखील तीन गुण घेत, तर श्वेता सावंतने तीन पकडी करीत तिला छान साथ दिली. पुण्याकडून श्रावणी सावंतने चढाईत सहा आणि पकडीत चार गुण घेत आपल्या अष्टपैलू खेळाची चुणूक दाखविली. यात तिला प्रतीक्षा लांडगे हिने चार व धनश्री तेलीने चार गुण घेत छान साथ दिली. पूर्ण सामना तिसर्‍या चढाईवरच खेळला गेला. कधी पुण्याकडे आघाडी, कधी सगळीकडे आघाडी, तर कधी बरोबरी असा गुणफलक दोलायमान स्थितीत हलत होता. शेवटी सांगलीने शेवटच्या क्षणी दोन गुणांनी बाजी मारत विजेतेपद आपल्याकडे खेचून आणले.

या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात परभणीने कोल्हापूरला 39-27 असे, तर नंदुरबारने सांगलीचा 34-33 असे चकवित अंतिम फेरीत धडक दिली. मुलींच्या उपांत्य फेरीत पुण्याने कोल्हापूरचा 46-30 असे, तर सांगलीने मुंबई उपनगरला 21-18 असे नमवित अंतिम फेरी गाठली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply