पेण : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पेण नगर परिषदेच्या सभागृहात आदिवासींना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 16 आदिवासी, कातकरी लाभार्थ्यांना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप करण्यात आले. आज खर्या अर्थाने लाभार्थी आदिवासी बांधव जमीनीचे मालक झाले असून त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीद्वारे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी मार्गदर्शन केले.
रायगडचे उपवनसंरक्षक अधिकारी आशिष ठाकरे यांनी वनहक्क दस्तऐवज योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोगिता ठुबे यांनी केले. पेणचे तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, साकव सामजिक संस्थेचे अध्यक्ष अरुण शिवकर, पेणचे वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर, वडखळ वनक्षेत्रपाल स्वाती डुंबरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रांत विठ्ठल इनामदार यांनी आभार मानले.