अलिबाग : प्रतिनिधी
किल्ले रायगडावर अनधिकृतपणे तयार करण्यात आलेले मदार मोर्चा प्रकरण ताजे असतानाच अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला येथेदेखील अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत मदार बांधली आहे. ही अनधिकृत मदार त्वरित हटवावी अशी मागणी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी पुरातत्त्व विभागाकडे केली आहे.
किल्ले रायगड मदार मोर्चा प्रकरणाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी पुरातत्त्व विभागाला पत्र दिल्यानंतर त्वरित तेथील रंगरंगोटी हटवून ठिकाण पूर्ववत करण्यात आले. तसेच सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच कुलाबा किल्ल्यातील तोफांच्या परिसरात मदारचे काम अनधिकृतपणे करण्यात आले आहे. ही मदार पूर्णतः अनधिकृत बांधण्यात आली आहे. हे बांधकाम करताना पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. किल्ल्यातील इतर कार्यक्रमाच्या वेळी पुरातत्त्व विभाग नेहमीच आक्षेप घेत असतो. पण किल्ल्यात मदार काम केले जात असताना किल्ल्यावरील अधिकारी, कर्मचारी कुठे होते, असा सवाल रघुजीराजे आंग्रे यांनी उपस्थित केला आहे.
कुलाबा किल्ल्यात एक पुरातन दर्गा आहे, त्याबाबत कोणताही आक्षेप नाही. मात्र आता बांधण्यात आलेली ही मदार पूर्णतः अनधिकृत आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा पुसून येथील जमीन हस्तगत करण्याचा डाव सुरू आहे. कुलाबा किल्ल्यावरील ही अनधिकृत मदार त्वरित हटवा. दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करा.
-रघुजीराजे आंग्रे, अलिबाग