Breaking News

जेव्हा विनोद तावडे दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिलासा मिळवून देतात…

देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे

घेणार्‍याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरूनी

सह्याद्रीच्या कड्यावरूनी

छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे

रक्तामधल्या प्रश्नासाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून

पिसाळलेली आयाळ घ्यावी

भरलेल्या भिमेकडून

तुकोबाची माळ घ्यावी

देणार्‍याने देत जावे

घेणार्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्‍याचे हात घ्यावे

कविवर्य विंदा करंदीकर यांनी रचलेल्या या काव्यरचनेच्या ओळी मी नयन-रेखा या कन्यकांना नेहमी सांगत असतो. तुम्ही कित्ती कित्ती म्हणून कराल आमच्यासाठी? या त्यांच्या सवालांवर माझं नेहमीच म्हणणं असतं की देणार्‍याने देत जावे, देणार्‍याने देत जावे। घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे॥ विंदांच्या या ओळी समाजात घडलेल्या घटनांमधून आपल्याला ठायी ठायी दिसून येतात. दान देणारा दाता हा खरोखरच महान असतो, मोठा असतो.

दात्याने एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हाताला माहीत होऊ नये, असा एक संकेत आहे. काही जण याचं ‘मार्केटिंग’ करतात, काही जण गवगवा करतात तर काही जण प्रसिद्धीपासून अलिप्त राहतात. राजकारण आणि समाजकारण यात या गोष्टी सतत घडत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात या घडीला भारतीय जनता पक्ष हा वैश्विक स्तरावरचा मोठा राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. 2013 पासून महाराष्ट्रात देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे राजकारणाच्या क्षितिजावर चमकले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आकस्मिक देहावसानानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. तेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे असे अनेक नेते समाजकारणात कार्यरत आहेत. असेच एक मातब्बर नेते आहेत विनोद श्रीधर तावडे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले जसे नेते आहेत, तसेच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या, युवकांच्या राजकारणातून, विद्यापीठाच्या निवडणुकीच्या राजकारणातून तरबेज झालेले राज-समाजकारणी नेते आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नितीन गडकरी या मातब्बर नेत्यांच्या समवेत अनेक चाली राजकीय सारीपाटावर खेळल्याचे राज्यातल्या जनतेने पाहिले आहे, अनुभवले आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात अव्वल दर्जाचे मंत्रिपद भूषविण्याचा मान मिळालेल्या विनोद तावडे यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर या जन्मदिनी राज्यात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात यावा, ही संकल्पना शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा अशा विविध खात्यांचा कारभार अत्यंत चाणाक्ष पद्धतीने चालवितांना तावडे यांनी अंमलात आणली. महाबळेश्वरजवळच्या भिलार या स्ट्रॉबेरी च्या गांवाला पुस्तकांच्या गांवात परिवर्तित करण्याची किमया विनोद तावडे यांनीच साधली. त्याच वेळी मी कल्पक डोक्याचे विनोद तावडे असे नमूद केले होते. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या स्थापनेपासून लोकराज्य हे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू या भाषांमध्ये मुखपत्र प्रकाशित होत असतानाही ‘सेवार्थ’ नावाचे स्वतःचे (विभागाचे) मुखपत्र प्रकाशित करून आपल्या खात्याच्या योजना, खात्याने घेतलेले निर्णय आदींची सचित्र माहिती मतदारांना, नागरिकांना, कार्यकर्त्यांना प्रमाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला.

विनोद तावडे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून माझ्याच हस्ते लता मंगेशकर पुरस्कार देण्यात यावा किंवा अन्य महत्त्वाचे पुरस्कार माझ्या हस्तेच प्रदान करण्यात यावेत, असा हट्ट कधी धरला नाही किंबहुना साध्या साध्या व्यक्तींना त्यांनी पुढे आणत प्रोत्साहन दिले. आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात यावेत, ही संकल्पनासुद्धा विनोद तावडे यांचीच, आषाढी-कार्तिकीला वारकर्‍यांना पंढरपूर दर्शन घडविण्यासाठी विशेष गाडीचे आयोजन सुद्धा त्यांचे. दसर्‍याला आपल्या कार्यकर्त्यांना प्रतीकात्मक गुढी पाठविण्याची प्रथाही त्यांनी सुरू केली. सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, एक महत्त्वाची माहिती विनोद तावडे यांनी प्रसिद्धीपासून दूर ठेवली असल्याचे नुकतेच माझ्या निदर्शनास आले.

समाजात ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या समाजासमोर आणण्यासाठी माझी सतत धडपड सुरू असते. या माहितीपासून तसा मी सुद्धा अनभिज्ञ होतो, पण प्रा. नयना रेगे यांनी एका घटनेकडे माझे लक्ष वेधले आणि मग मी आमचे मित्र, भारतीय जनता पक्षाचे आमच्या प्रभागाचे अध्यक्ष अनंत कलबुर्गी यांना याबद्दल विचारणा केली. मग मला सविस्तरपणे माहिती मिळाली. ही घटना, ही बाब खरोखरच अनुकरणीय आहे. बोरीवली पूर्व येथील शिरोडकर हे कुटुंब डिस्कव्हरी सोसायटी येथे वास्तव्यास आहे. या शिरोडकर परिवारातील वृद्ध गृहस्थ श्री. रमाकांत शिरोडकर 2018च्या ऑगस्ट महिन्यात वारले. ते परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी होते ते त्याच शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले. रमाकांत शिरोडकर हे वारल्यानंतर अचानक नोव्हेंबर 2018 मध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचे पत्र शिरोडकर यांच्या घरी विनोद तावडे यांच्या भारतीय जनता पक्ष कार्यालयातून पक्षाचा कार्यकर्ता दिवाळीच्या फराळाबरोबर घेऊन आला.

प्रति, शिरोडकर कुटुंबीय, नमस्कार! शुभ दीपावली! दिवाळी म्हणजे कुटुंबीय, मित्रपरिवार, आप्तेष्ठांसोबत साजरा करण्याचा सण. मला कल्पना आहे की या वर्षी आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या आठवणींसोबत ही दिवाळी आपल्याला साजरी करावी लागणार आहे. त्यांचा स्वभाव, आवडी-निवडी, असंख्य लहान मोठ्या गोष्टी अशांचे या वेळी स्मरण होईल. त्यांचा स्नेह, आशीर्वाद आणि आठवणींसोबत ही दिवाळी आपण साजरी करू या. आपणास आणि आपल्या कुटुंबीयांना ही दिवाळी शांततापूर्ण जावी, याच सदिच्छांसह! आपला : विनोद तावडे (भ्रमणध्वनी क्रमांक) 1 नोव्हेंबर 2018 रोजीचे विनोद तावडे यांच्या स्वाक्षरीने आलेले हे पत्र असल्याची माहिती मिळाली. आता हे पत्र, यासंदर्भातील पार्श्वभूमी लक्षात घेता अशी माहिती मिळाली की विनोद तावडे यांनी आपली कार्यकर्ते मंडळी कामाला लावली. स्मशानभूमीतून मृत व्यक्तींची यादी, त्यांच्या कुटुंबीयांचे पत्ते मिळवून त्यांच्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सांत्वनपर पत्र पाठविणे, सणावाराला, विशेषतः दिवाळीच्या वेळी आवर्जून पत्र पाठवून आपण आपल्या शोकमग्न परिवारासोबतच आहोत, ही जाणीव करून देत त्यांचे दुःख हलके करणे, या आज फार दुर्मिळ झालेल्या बाबी विनोद तावडे हे बर्‍याच वर्षांपासून करीत आहेत. किंबहुना हे आताशा त्यांच्या अंगवळणीच पडले आहे.

या केवळ आरंभशूर म्हणून न करता त्यात त्यांनी सातत्य ठेवले आहे. म्हणूनच एक जागरूक पत्रकार म्हणून मला या गोष्टीची आवर्जून दखल घ्यावीशी वाटली. केवळ इतकेच करून विनोद तावडे थांबले नाहीत, तर आपल्या शहर, मतदारसंघात बूथ पातळीवर कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांच्या दैनंदिन जीवनात, दैनंदिन व्यवहारात भेडसावणार्‍या गोष्टींमध्ये आवर्जून लक्ष घालून त्यांनाही दिलासा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि करीत आहेत.

निवडणुकीत उमेदवारी मिळो अथवा ना मिळो आपल्या समाजकारणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू न देता ते काम करीत आहेत आणि म्हणूनच उमेदवारी न मिळालेल्या आणि वैफल्यग्रस्त झालेल्या नेत्यांपेक्षा विनोद तावडे हे निश्चितच उजवे ठरतात. ‘परिणामांची भीती न आम्हा!’ या न्यायाने अविरत कार्य करणार्‍या या बहाद्दर नेत्याला म्हणूनच उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो. त्यांच्या हातून त्यांनी स्वीकारलेले हे असिधारा व्रत अखंड सुरूच राहो, या मनापासून शुभेच्छा!

इंदिरा गांधी जनता लाटेत पिछाडीवर गेल्या, परंतु नंतर फिनिक्ससारख्या पुनश्च हरी ओम म्हणून पुढे झेपावल्या. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. उद्याच्या उषःकाली आपल्या जबरदस्त समाजकारणाच्या जोरावर विनोद तावडे हे गरुडझेप घेतील हे निःसंशय! विनोद तावडे यांच्या या कामामुळे मला विंदांची ही ‘देणार्‍याने देत जावे’ या काव्यरचनेच्या ओळी आठवल्या. बरोबर नां? विनोद तावडे यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. मनःपूर्वक अभिनंदन!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply