Breaking News

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा

रोहा सिटीझन फोरमची मागणी

धाटाव : प्रतिनिधी

मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे काही दिवसांपुर्वी रोहे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता.  सहा दिवसांनंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला खरा परंतु अनेक भागात अजूनही अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. रोहा तालुका सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची भेट घेतली आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा, पाणी संकटाला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली.

रोहा नगर परिषदेची 13.5 कोटी रुपये खर्चाची नवीन वाढीव नळपाणी योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र जलवाहिन्यांचे काम चुकीचे, नियोजन शून्य व दर्जाहीन करण्यात आल्याने जलवाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड होत असतो. तांत्रिक दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा महिन्यातून दोन दिवस बंद ठेवण्यात येतो. गेल्या महिन्यात तर सहा दिवस पाणीबाणी ओढवली होती. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी नागरिकांना खूप कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे.

शहराचा पाणीपुरवठा तसेच वाढीव नळपाणी योजनेत झालेल्या सावळागोंधळाबाबत रोहा सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्याधिकारी गोरे यांची भेट घेतली.  फोरमचे अध्यक्ष नितिन परब, अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, निमंत्रक आप्पा देशमुख, उस्मानभाई रोहेकर, महेश सरदार, राजेश काफरे, प्रशांत देशमुख, मिलिंद अष्टीवकर आदींनी यावेळी मुख्याधिकारी गोरे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले.

येत्या तीन-चार दिवसात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती मुख्याधिकारी गोरे यांनी यावेळी दिली.

जलवाहिनी दुरुस्तीनंतर काही दिवस शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. आता दीडशे एचपी मोटारद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत नागरिकांना नियमित मुबलक पाणी उपलब्ध होईल.

-दयानंद गोरे, मुख्याधिकारी, रोहा नगर परिषद

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply