Breaking News

भाजपची मुसंडी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवून पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकाविला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तिन्ही पक्षांना धोबीपछाड देऊन विरोधी पक्ष भाजपने मिळविलेले यश निश्चितपणे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. राज्यात नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली, मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या राखीव जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. या जागा अनारक्षित करून पुन्हा निवडणूक घेण्यात आली.  मतमोजणीअंती संपूर्ण नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपने सर्वाधिक नगरपंचायती जिंकतानाच सदस्यसंख्येतही पहिला क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिसर्‍या स्थानी राहिली. मुख्यमंत्री असूनही शिवसेना मात्र पिछाडीवर पडली. राज्य सरकारच्या निष्क्रिय व कुचकामी कारभारामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले आणि त्याचा फटका सरकारमधील तिन्ही पक्षांना बसला. असे असले तरी भाजपच्या विजयाचे महत्त्व कमी होत नाही. 2014च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपने राज्यात जम बसविला. त्यानंतर पक्षाचा पाया व्यापक केल्याचे निकालांवरून स्पष्ट होते. मध्यंतरी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक आणि गेल्या महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही भाजपने किती मजबूत बांधणी केली आहे, याचा प्रत्यय आला होता. त्यानंतर सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका आणि आता 106 नगरपंचायती व दोन जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालावरून भाजपची पाळेमूळे किती घट्ट रोवली गेली आहेत हे समोर आले. शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागांमध्येही भाजपने यश मिळविले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यात सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना फटका बसला. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले. त्यामुळे भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांचे वर्चस्व दिसून आले. राष्ट्रवादीचेच आणखी एक नेते एकनाथ खडसे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला पराभूत केले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. बेताल वक्तव्ये करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही नागपूरमध्ये फटका बसला. सातार्‍यात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांना शिवसेनेकडूनच पराभव पत्करावा लागला. अशा प्रकारे अनेक ठिकाणी उलटफेर पहावयास मिळाले. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याने किंबहुना प्रत्येक पक्ष आपापले स्वार्थ जपण्यात मश्गूल असल्याने राज्यात मराठा व ओबीसी आरक्षण, एसटी संप यांसारखे अनेक प्रश्न आ वासून उभे असून जोडीला भ्रष्टाचार, गैरव्यवहार आहेतच. त्यामुळेच जनतेने त्यांना जागा दाखवली असून प्रभावीपणे काम करणार्‍या भाजपला साथ दिली. राज्यात आगामी निवडणुकांमध्येही हाच ट्रेण्ड राहिल्यास आश्चर्य वाटायला नको!

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply