लग्नाला या, पूजेला या, यात्रेला या असे निमंत्रण आपण नेहमी ऐकतो, पण आता पोपटीला या असे निमंत्रण देखील ऐकावयास मिळत आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरू आहे. विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी, बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची वैशिष्ट्यपूर्ण व लज्जतदार पोपटी प्रसिद्ध आहे. गुलाबी थंडीत पोपटीला मजा येते, ठिकठकाणी शेतावर या पोपटी पार्ट्यांची धूम पाहायला मिळते. येथे गप्पागोष्टींच्या मैफलीमध्ये सुखदुःखाची देवाणघेवाणही होते. यंदा गावठी वालाला विलंब झाल्याने पुणेरी टपोरी शेंगांची चलती सुरू आहे, वाढदिवस, पार्टीला पोपटीचे नियोजन केले जाते, लोक आवडीने येतात. नगरपंचायत निवडणुकीत जिंकलेले उमेदवार आता विशेष पोपटी पार्टीचे आयोजन करताना दिसत आहेत.
वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात. त्यामध्ये कांदा व बटाटा तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या मातीत पिकविलेल्या चवदार टपोर्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीला अधिक पसंती आहे, मात्र हंगाम उलटून गेला तरी सध्या येथील स्थानिक गावठी शेंगा अजून तयार झाल्या नसल्याने पुण्यावरून आलेल्या शेंगावरच खवय्यांना सध्या समाधान मानावे लागत आहे. स्थानिक गावठी वालांच्या पोपटीतील वालाच्या शेंगा कितीही खाल्या तरी त्या पोटाला बाधत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पहायला मिळते. येथे काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात तर गप्पागोष्टींच्या मैफलीमध्ये सुखदुःखाची देवाणघेवाणही होत आहे. अशातच निडीच्या गावठी शेंगांना पसंती मिळत आहे. पोपटीसाठी अस्सल गावठी शेंगांनाच पसंती असते. गावठी शेंगांमुळेच खरी लज्जत व चव टिकून राहते. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा विशिष्ट गोड चव व टपोरे दाण्यांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. निडीगावच्या परिसरातील जमिनीचा पोत कसदार असून परंपरागत पद्धतीने जपवूणक करून ठेवलेल्या बियाणांचाच वापर येथे केला जातो. हे बियाणे दुसरे कुठे नेऊन पिकविल्यास अशी दर्जेदार शेंग होत नाही. या वालाला विशिष्ठ गोड चव, शेंगेचा आणि दाण्याचा आकारही मोठा. सुरुवातीस बांधावर आलेल्या शेंगांची चव तर अधिकच रुचकर. या शेंगांचा वाल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
गावठी वालाला मागणी
खास करून पोपटी करण्यासाठी गावठी वालाच्या शेंगाना मागणी असते. जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारण साडेपंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास चार हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. वालाला सुरुवातीस दर चांगला मिळतो. किलोला 100 ते 120 रुपये. नंतर शेंगा सर्वत्र येऊ लागल्यावर शेवटी दर 40 ते 50 रुपये किलोपर्यंत जातो. लागवड व मशागत करण्यासाठी मेहनत लागते. वातावरणाने साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळते. शेंगा सुकवून त्यापासून मिळालेल्या वालाची विक्री देखील केली जाते.
साहित्य
गावठी वालाच्या किंवा पुण्याच्या भरलेल्या टपोर्या शेंगा, कांदा, बटाटा, मांसाहारी खाणारे असल्यास अंडी किंवा मसाला लावलेले चिकन, ओवा, जाडे मीठ व भामरुडीचा (भांबुर्डी) पाला आणि हे सर्व जिन्नस शिजविण्यासाठी मातीचे मोठे मडके व जळणासाठी लाकूड, पेंढा आणि गोणपाट इत्यादी.
भांबुर्डीच्या पाल्याचे विशेष
भांबुर्डीच्या पाल्याचे विशेष आहे. याला गोरखमुंडी, वसई – विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगड मध्ये भांबुर्डी किंवा भामरुड असे म्हणतात. पावसाळ्यानंतर हा पाला रस्त्याच्या कडेला माळरानात सर्वत्र उगवतो. या पाल्यात औषधी गुणधर्म असतात. जखम झाल्यास पाल्याचा रस जखमेवर चोळतात. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने पाणी नसताना देखील याच्या वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात. तसेच वालच्या शेंगा पोटाला बाधत नाहीत आणि चवदेखील येते हे याचे विषेश.
पोपटी बनविण्याची विशिष्ट पद्धत
पोपटी बनविण्यापूर्वी सर्व साहित्य जमवून ठेवणे आवश्यक. सर्व प्रथम मोठ्या मडक्यामध्ये तळाला भामरुडचा पाल्याचा थर लावावा. भामरुडचा पाला सगळीकडे मोठ्या प्रमाणात उगविलेला आहे. मग त्यावर टपोर्या वालाच्या शेंगाचा एक थर लावावा. त्यावर बटाटा व कांदे ठेवावेत, चिकन मांसाहारी असल्यास चिकन व अंडी ठेवावे. यावर जाडे मीठ व ओवा गरजेप्रमाणे पसरावा. पुन्हा अशाच प्रकारे वालाच्या शेंगाचा टाकून इतर साहित्याचा थर लावावा. मडके भरल्यानंतर त्याला नीट हालवावे जेणे करुन आतील सर्व जिन्नस घट्ट बसेल. त्यानंतर मडक्याचे तोंड भामरुडीच्या पाल्याने घट्ट बंद करावे. तीन विटांवर अथवा दगडावर मडके पालथे/उपडे करून ठेवावे. बाजुने पेंढा व लाकुड पेटवावेत. चांगली धग लागण्यासाठी मडक्यावर गोणपाट टाकावेत. मडक्याला सर्व बाजूने नीट उष्मा मिळाल्यास साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये आतील सामग्री नीट शिजते. काही जण पाण्याचे दोन तीन थेंब मडक्यावर टाकतात ते थेंब लगेच गायब झाल्यास पोपटी शिजली असे समजावे. मग मडके हळूच गोणपाटाने उचलून एका चादरीवर अथवा गोणपाटावर उपडे करावे आणि आतील सामर्गी त्यावर काढून ताबडतोब ते गुंडाळवावे याला दडपवणे असे म्हणतात. ज्यामुळे वाफ लगेच निघून जात नाही शेंगा करपत नाहीत आणि चव तशीच राहते. आता गरमागरम लज्जतदर शेंगा, कांदा, बटाटा, अंडी आणि चिकनची मजा लुटण्यासाठी तुटून पडा.
मडके नाही मग पत्र्याच्या डब्यातही करा पोपटी
पोपटीसाठी मडक्यांनादेखील खूप मागणी असते. मडके उपलब्ध नसल्यास त्याऐवजी तेलाच्या पत्र्याच्या डब्यामध्येही पोपटी केली जाते. यासाठी पत्र्याच्या डब्याचे तोंड तीन बाजूने कापलेले असते. अगदी मडक्यात लावतात त्याप्रमाणे कृती करून पत्र्याचे झाकन घट्ट लावावे व आगीवर उपडे ठेवावे. काही वेळेला मडके फुटते किंवा त्याला तडा जातो आणि आतील साहित्य करपते किंवा अर्धवट शिजते, मात्र पत्र्याच्या डब्यामध्ये ही भीती नसते आणि तो वारंवार वापरता देखील येतो.
-धम्मशील सावंत, खबरबात