पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून त्यांंनी ही माहिती दिली, तसेच येत्या 23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करत आहे. त्यानिमित्त दिल्लीतील इंडिया गेटवर ग्रॅनाइटपासून बनवलेला नेताजींचा भव्य पुतळा बसवला जाईल हे सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जोपर्यंत नेताजींचा भव्य पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा तिथेच राहणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, देशाच्या इतिहासात वीर जवानांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात असणारी अमर जवान ज्योती ही राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्यात येणार आहे. एक समर्पिक संग्रहालय आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक असल्याने तेथील स्मारक ज्वालेमध्ये अमर जवान ज्योतीमधील ज्वाला एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper