Breaking News

भारताला नव्या संधी प्रदान करणारा ‘प्रजासत्ताक’

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

प्रजासत्ताक दिन दरवर्षी येत असला तरी तो प्रत्येकवर्षी वेगळा असतो. तो अनेक आव्हाने घेऊन येतो तसेच अनेक संधींची पेरणी करून जातो. कोरोना साथीने जगासमोर उभे केलेले आव्हान आणि त्यातून भारताला अनेक क्षेत्रात मिळत असलेली संधी, ही काळ्या ढगांना असलेली सोनेरी किनार आहे. अर्थात, तिचे महत्त्व देशातील प्रत्येक नागरिकाला लक्षात आले तर येणार्‍या प्रत्येक प्रजासत्ताक दिनाची वाटचाल भेदभावमुक्त व्यवस्थेकडे वेगाने होऊ शकेल.

आपण रस्त्याने पायी प्रवास करतो आहे की सायकलने की स्वयंचलित दुचाकीने की मोटारीने, यावर नजरेला दिसणार्‍या घटनांवरील आपली प्रतिक्रिया अनेकदा अवलंबून असते. रस्ता कसा आहे, किती मोठा आहे आणि त्यावर किती गर्दी आहे, यावर आपला त्यावरील प्रवास कसा होईल, हे अवलंबून असते. या स्थितीचा एकदा स्वीकार केला की, त्याविषयी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलण्याची गरज पडत नाही, पण तिचा स्वीकार केला नाही तर मानसिक त्रास हा ठरलेला असतो. उदा. अनेकदा असे होते की आपण ज्या साधनाने प्रवास करत असतो, तीच साधने वापरणारे आपले समसुखी समदु:खी होतात आणि इतर साधनांचा वापर करणारे आपल्या टीकेचे धनी होतात. म्हणजे मोटारीत बसणार्‍या नागरिकास वाटते की पायी चालणार्‍यांना काही कळत नाही, तर पायी चालणारे मोटारीत बसणार्‍यांकडे वक्रदृष्टीने पाहत असतात. आपण प्रवास करतो आहोत, त्या रस्त्याच्या काही मर्यादा आहेत, हे अनेक नागरिकांच्या लक्षातच येत नाही. आज आपल्या देशातील सर्व पातळ्यांवरील समजगैरसमज समजून घ्यायचे असतील, तर रस्त्याच्या प्रवासाचे हे उदाहरण त्याला चपखल लागू होते. लोकसंख्येच्या तुलनेत साधनांची असलेली कमतरता आणि त्याच्या न्याय्य वाटपाच्या व्यवस्थेच्या मर्यादा आधी समजून घ्याव्या लागतील आणि त्यातल्या त्यात भेदभावमुक्त व्यवस्थेच्या उभारणीसाठी सामुहिक प्रयत्न करावे लागतील.

भारतीय समाजाचे वेगळेपण

आपल्याला विशेषतः उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ही चर्चा आपण केलीच पाहिजे. सहा लाख खेडी आणि 140 कोटींच्या घरात असलेली लोकसंख्या आणि 425 इतक्या प्रचंड घनतेच्या (एकाचौरस किलोमीटरमध्ये राहणारे सरासरी नागरिक) आजच्या भारताकडे आज आपण कसे पाहतो, यावर आपला प्रवास कसा होणार हे अवलंबून आहे. स्वातंत्र्याने आपल्याला अधिकार दिले असतील तर प्रजासत्ताक दिनाने आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिली आहे, पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येत आणि भूभागावर राहणार्‍या नागरिकांचे हितसंबंध एकाचवेळी जपणे, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षांच्या आपल्या देशाच्या प्रवासाविषयी तक्रार करणारे नागरिक आपल्याला दिसतात. इतर देशांशी तुलना करून काही नागरिक दु:खी होताना दिसतात. पण आपण हे विसरतो की आपला देश वेगळा आहे. त्याचे प्रश्न वेगळे आहेत. आपण म्हणू त्याच पद्धतीने ते प्रश्न सुटतील, असे आज कोणीच म्हणू शकणार नाही, इतके ते गुंतागुंतीचे आहेत. लोकशाही राज्य व्यवस्थेमधील अपरिहार्य अशा मतमतांतरांमुळे ते सोडविण्याचा वेग आणखीच कमी झाला आहे, हेही आपल्याला समजून घ्यावे लागेल. पण हे आपण मान्य करत नाही, त्याची काही कारणे आहेत.

आपला देश वेगळा-आपले प्रश्न वेगळे

माणसाला सर्वांत जास्त त्रास कशाचा होत असेल तर तो भेदभावाचा. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील भेदभाव कमी व्हावा, यासाठी एक देश म्हणून अनेक प्रयत्न झाले असले आणि होत असले तरी ते कधीच पुरेसे ठरत नाहीत. जगातील सर्वांत परिपक्व लोकशाही आणि कमीतकमी भेदभाव आहेत, असे मानले जाणार्‍या अमेरिकेत गेली काही वर्षे जी उभी फूट पडलेली दिसते आहे, ते आपल्यासमोरील मोठेच उदाहरण आहे. अर्थात, सर्वच बाबतीत अमेरिकेचा आदर्श घ्यावा, अशी आज परिस्थिती नाही. भारतीय नागरिकांच्या गरजा, त्यांची मानसिकता, सुखदु:खाच्या कल्पना वेगळ्या असल्याने त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. उदा. धार्मिक पर्यटनाला भारतीय समाजात जे महत्त्व आहे, त्याची तुलना इतर देशांशी होऊ शकत नाही. त्यामुळे भारतात धार्मिक पर्यटनाच्या सोयी अधिकाधिक झाल्या पाहिजेत. सध्या सरकार ही गरज मान्य करताना दिसते आहे ही चांगली गोष्ट आहे. धार्मिक पर्यटनाचा आणि आर्थिक विकासाचा भारतात अतिशय जवळचा संबंध असून तो मान्य करणे म्हणजे हे वेगळेपण मान्य करणे होय.

सार्थ अभिमान असला पाहिजे, पण..

‘सर्व माणसांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता (पृथ्वी) निसर्गात आहे, मात्र माणसाची हाव तो पूर्ण करू शकणार नाही’, असे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगून ठेवले आहे आणि आजच्या जगाला तेच मान्य होत नाही. जग बाजूला ठेवू, पण आपल्या देशाचा गेल्या 75 वर्षांचा प्रवास पाहिला तरी आपण कोठून कोठे झेप घेतली आहे! भारतीय नागरिक म्हणून या प्रवासाचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे, पण होते असे की प्रवासात जे मिळविले आहे त्याची फळे सर्वांपर्यंत पोहचविण्याची कार्यक्षम व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. त्यामुळे अभिमान तर दूरच, आम्ही टोकाच्या आत्मविवंचनेत अडकून पडलो आहोत. एका देशाचे नागरिक म्हणून जी मजबूत मूठ निर्माण व्हायला हवी, तशी होत नाही, त्याचे कारण भेदभावमुक्त व्यवस्थेचा अभाव हेच आहे.

भेदभावमुक्त व्यवस्था म्हणजे काय, असा प्रश्न जेव्हा समोर येतो, तेव्हा सर्वांना सर्व काही मिळाले पाहिजे, अशी एक कल्पना केली जाते. पण तंतोतंत तसे कधी होणार नाही याचे भान ठेवले पाहिजे. माणसाच्या मनातील समृद्ध, आनंदी जीवनाच्या कल्पना इतक्या वेगवेगळ्या आहेत की प्रत्येक जण नकळत आपल्या ताटात जास्त वाढून घेतो आणि मी माझाच वाटा काढून घेतला असे सांगू लागतो. त्यामुळे कोणी आपल्या ताटात किती वाढून घेणे न्याय्य आहे, असे सांगणारी एक तटस्थ व्यवस्था लागते. ती व्यवस्था जितकी चांगली, तितका भेदभावाचा मानसिक त्रास कमी. तो कमी होणे, ही आजची खरी गरज आहे. चांगली बाब म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाची वाटचाल आणि सरकारी यंत्रणांचे प्रयत्न, या आधारे तशा व्यवस्थेच्या दिशेने आपण प्रवास करतो आहोत. हा प्रवास सतत चालू ठेवणे आणि प्रजासत्ताक दिनासारख्या मुहूर्तावर त्याचा आढावा घेणे, हे आपण जाणीवपूर्वक केले पाहिजे. अर्थात, आज या दृष्टीकोनातून आपल्या देशाकडे पाहिले, तर प्रत्येकाला हा प्रवास वेगळा दिसेल, हेही गृहीतच आहे.

या सर्व चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा राहतो, त्याची आठवण प्रजासत्ताक दिनानिमित्त केलीच पाहिजे. तो मुद्दा म्हणजे ही प्रजेची सत्ता आहे याचा अर्थ प्रजा सर्वसत्ताधीश आहे, पण ही सत्ता मान्य करण्याची त्यातल्या त्यात एक व्यवहारी पद्धत म्हणजे लोकशाही शासनपद्धती आपणच शोधून काढली आहे. अशा पद्धतीत काहीच त्रुटी राहू नयेत, अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे. पण अशी पद्धत शोधून काढण्यात अजून जगाला यश आलेले नाही. तसे ते भारतालाही यश आलेले नाही. खरे म्हणजे तो दीर्घकालीन प्रवास आहे आणि सारे जग त्या दिशेने निघाले आहे. या प्रवासात आपण कोणती सकारात्मक भर टाकू शकतो, हेच आपण पाहिले पाहिजे. ते पाहणे म्हणजे नागरिक म्हणून त्या त्या वेळी वाट्याला आलेली विशिष्ट भूमिका मनापासून मान्य करणे. ते एकदा मान्य केले की अधिकारासोबत कर्तव्याची आठवण वेगळी करून देण्याची गरज राहत नाही.

कर्तव्याची ही जाणीव अर्थातच, ज्यांना या देशाने भरपूर संधी दिली त्यांची अधिक आहे. जे सुजाण आहेत त्यांची आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे असा मोठा वर्ग आज देशात आहे. प्रचंड वैविध्य असलेला आणि तेवढाच मोठा असलेला हा देश तेव्हाच समृद्ध होईल, जेव्हा आहे त्या संधीचे वाटप भेदभावमुक्त व्यवस्थेमार्फत केले जाईल. अशी व्यवस्था प्रत्यक्षात आणण्याचा पुरुषार्थ या प्रजासत्ताक दिनी पुन्हा केला पाहिजे.

केवळ उणिवांवर बोट नको!

बदलत्या आधुनिक जगात भारताकडे असलेले प्रचंड मनुष्यबळ आणि त्या माध्यमातून आलेल्या क्षमता, याकडे आपण संधी म्हणून पाहिले तर 2022 आणि त्यानंतरच्या भविष्यात भारताचा विचार न करता जगाला पुढे जाता येणार नाही, पण त्यासाठी भारतीय समाज आणि देशाच्या केवळ उणीवांवर बोट ठेवून त्याला नाउमेद करण्यापेक्षा त्याला त्याने अनेक विसंगतीमध्ये केलेल्या प्रचंड निर्मितीची आणि त्याच्यातील क्षमतांची जाणीव करून दिली पाहिजे. अशा स्वच्छ चष्म्याने आपण आपल्या देशाकडे पाहिले तर काय दिसते पहा.

भारत नावाच्या या उपखंडावर निसर्गाने भरभरून केलेली उधळण, उज्ज्वल भारतीय संस्कृती, केवळ मानवजातीलाच नव्हे तर सर्व सजीव-निर्जीव सृष्टीच्या शाश्वत कल्याणाचा आग्रह धरणारे, वसुधैव कुटुंबकम् हा गाभा असलेले भारतीय तत्त्वज्ञान, नियतीने आधुनिक जगाला ज्या धोकादायक टप्प्यावर आणून उभे केले आहे, त्या टप्प्यावर भारतावर येऊन पडलेली नैसर्गिक जबाबदारी आणि या सर्व पार्श्वभूमीवर वर्तमानात भारतात होत असलेले क्रांतिकारी परिवर्तन… असा योगायोग जुळून येणे, ही नव्या दशकात जगाला मिळालेली देणगीच म्हटली पाहिजे. कोणाला ही अतिशयोक्ती वाटू शकेल, पण ज्या संवेदनशील नागरिकांना आजच्या जगातील ताण जाणवतो आहे, ते ज्या दिशेच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा योगायोग अतिशय आनंददायी आणि आशादायी आहे, हे निश्चित. ज्या भारताला आज भांडवलासाठी जगाकडे मागणी करावी लागते, तो जगाला दिशा देईल, यावर कोणाचा सहजी विश्वास बसण्याचे कारण नाही. पण ज्यांनी गेल्या दशकातील जगाची दमछाक आणि भारतातील बदलांचे महत्त्व जाणले आहेत, त्यांना आजचे आणि उद्याचे जग आता केवळ प्रगतीच्या मागे पळत सुटणे, अजिबात मान्य होणार नाही. असे नागरिक जेव्हा जगाच्या शाश्वत कल्याणाची दिशा शोधू लागतात, तेव्हा त्यांना भारताच्या सर्व क्षमतांकडे पाहण्याशिवाय पर्याय राहात नाही.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply