Breaking News

मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घेतला कर्जत बाल उपचार केंद्राचा आढावा

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी भेट देऊन आढावा घेतला.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या सिटीसीमध्ये सध्या एकूण 13 तीव्र श्रेणीतील बालके उपचार व पोषण सेवा घेत आहेत. जिल्हा विकास निधी डीपीसीमधून मंजूर केलेल्या निधीमधून चालवण्यात येणार्‍या या बाल उपचार केंद्रात दाखल करण्यात आलेल्या कुपोषित बालकांवर मोफत पोषण आहार, औषधोपचार करण्यात येतात तसेच या मुलांसोबत राहणार्‍या एका पालकालाही भोजन व बुडीत मजुरी देण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात या मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून, या वॉर्डाची स्वच्छता, देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक केली आहे. या सर्व सुविधांची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी केली. भेटीदरम्यान त्यांनी डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांना सुविधा व उपचार सेवेबाबत सूचनाही दिल्या. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी कुपोषित मुलांच्या आरोग्यविषयक तपासण्या व त्यांच्यावर उपचार कसा केला जात आहे याबाबत माहिती दिली. कर्जतचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी छतरसिंग रजपूत या वेळी उपस्थित होते. दरम्यान, कर्जतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगदंड यांनीही या बाल उपचार केंद्रास भेट दिली व तेथील मुलांची विचारपूस केली. पुढील वर्षापासून बाल उपचार केंद्राचा निधी हा आरोग्याच्या वार्षिक निधीमध्येच समाविष्ट असावा, तसेच तालुक्यातील मध्यम कुपोषित श्रेणीतील मुलांसाठी गाव पातळीवर ग्राम बालविकास केंद्र (सीडीसी) सुरू करण्यासाठीही जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दिशा केंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले यांनी या वेळी केली.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply