Breaking News

ध्वजसंहितेची ओळख

देशाचा मान आणि अभिमान म्हणून आपण आपल्या राष्ट्रध्वजाकडे कायम पाहतो. निळ्या आकाशात डौलाने फडकणारा तिरंगा पाहून सर्व भारतीयांचे ऊर भरून येते. आपल्या राष्ट्राचे प्रतिक मानला गेलेल्या आणि प्राणापलीकडे प्रिय असलेल्या या राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगणार्‍या ध्वजसंहितेची ही थोडक्यात ओळख.

भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज येथे राहणार्‍या विविध धर्माच्या लोकांसाठी एकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे राष्ट्रध्वजाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त आपल्या राष्ट्रध्वजाचे नियम म्हणजेच ध्वजसंहिता काय आहे, हे आज आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

आपला राष्ट्रध्वज तीन रंगांचा आहे, म्हणून त्याला तिरंगा असेही म्हणतात. भारतीय तिरंग्याच्या वरच्या बाजूला गडद केशरी, या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा, या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. तर खालील भागात हिरवा, हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. पांढर्‍या रंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. अशाप्रकारे तीन रंगाचे पट्टे मिळून भारताचा आयताकृती तिरंगा बनला आहे. मधोमध निळ्या रंगाचे एकूण 24 आरे असलेले अशोक चक्र आहे. तिरंगा खादीच्या कापडापासून बनवलेला असतो आणि हाताने विणलेला असतो. राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा, असा सरकारी नियम आहे. तिरंगा ध्वजाची लांबी आणि रुंदी नेहमी 3:2च्या प्रमाणात असावी.

राष्ट्रध्वज सर्वांना दिसेल असा उंच ठिकाणी फडकवायचा असतो. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातो. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.

राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक व उत्साहाने हळूहळू खांबावर चढवण्यात यावा, तसेच त्याच गतीने तो आदरपूर्वक भावनेने खाली उतरवायला हवा. राष्ट्रध्वजाला केशरी रंग खालच्या बाजूला येईल अशा उलट्या पद्धतीने फडकविणे गुन्हा मानला जातो. फडकविण्यात येणारा तिंरगा फाटलेल्या, मळलेल्या वा चुरगळलेल्या स्थितीत नसावा. राष्ट्रध्वजाचा खांब वाकलेल्या अवस्थेत नसावा.

राष्ट्रध्वजाचा उपयोग कोणत्याही उत्सवात सजावटीसाठी करता कामा नये. जमिनीला राष्ट्रध्वजाचा स्पर्श होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही जाहिरातीत अंगावर घालण्यासाठी, नेसण्यासाठी किंवा त्याचा चादरीसारखा वापर करता येत नाही. राष्ट्रध्वजाला फाडणे, खराब करणे किंवा जाळले जाऊ नये. फाटलेला किंवा जुना झालेला राष्ट्रध्वज एकांतात योग्य पद्धतीने जाळून किंवा अन्य प्रकारे नष्ट केला जातो. राष्ट्रध्वजाला आकर्षक बनवण्यासाठी त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर केली जाऊ नये.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थितांकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्याही मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे.

कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये. ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही. ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येत नाही. तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करता येत नाही. कोणी तिरंग्याच्या कपड्याचा वापर करत असेल तर तो अवमान ठरतो. तिरंग्याचा रुमाल म्हणूनही वापर करता येणार नाही राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. तिरंग्याचा व्यावसायिक वापर करता येत नाही. तिरंग्याचा अपमान केल्यास किंवा तिरंग्याबाबत अवमानकारक टिप्पणी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तिरंग्याचा वापर मृतदेहाभोवती लपेटण्यासाठी करता येणार नाही. फक्त शहिदांच्या मृतदेहाभोवती तिंरगा लपेटला जाऊ शकतो.

आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर, सन्मान करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या राष्ट्रध्वजाची संहिता माहीत असणे आवश्यक आहे. बहुतांश नागरिकांना राष्ट्रध्वजाचे नियम माहीत नसतात. त्यामुळे या लेखाचा उद्देश भारतीय तिरंग्याचे नियम माहीत करून देणे हा आहे.

-संकलन : तन्वी गायकवाड, पनवेल

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply