Breaking News

शेतीसाठी धरणे, पण…

कर्जत तालुक्यात असलेले पाझर तलाव आणि तीनपैकी दोन लघुपाटबंधारे प्रकल्प यातून सिंचनासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे अनेक भागांत हिरवाई फिरू लागली आहे. सिंचनाखाली येत असलेल्या जमिनीवर उन्हाळी शेती केली जात असून दुबार शेतीमुळे बळीराजा आनंदात जगू शकत आहे, मात्र तालुक्यातील पाझर तलाव आणि धरण यामधून अनियमित आणि खात्री नसलेली पाण्याचे वितरण यामुळे शेतकरी भाताची दुबार शेती करायला घाबरत आहेत. निश्चित आणि ठामपणे पाण्याचा बेभरवसा यामुळे भाताची शेती कार्याची तयारी शेतकरी दाखवत नाहीत. त्यामुळे सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या तीन लघुपाटबंधारे प्रकल्प आणि सहा पाझर तलाव अशी जलसंपदा कर्जत तालुक्यात असूनदेखील दुबार शेतीसाठी ते पाणी आवश्यक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने भाताची शेती जेमतेम 40 टक्के केली जात आहे. त्यामुळे चहुकडे पाणी, पण शेतीसाठी पाणी नाही, असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

कर्जत हा भातशेतीचे कोठार समजल्या जाणार्‍या जिल्ह्यातील तालुका. त्या तालुक्यात फार्महाऊस संस्कृती येण्याआधी सर्वत्र शेती केली जायची. शेतीचे क्षेत्र लक्षात घेऊन कर्जत तालुक्यात 1980च्या दशकात पाझर तलाव बांधण्यात आले. त्यात खांडस, कशेळे, जामरूंग, डोंगरपाडा, खांडपे आणि साळोख या सहा ठिकाणी पाझर तलावांची निर्मिती केली गेली आहे. तर तालुक्यात पाषाणे, पाली भूतीवली आणि अवसरे अशा तीन ठिकाणी लघुपाटबंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील पाली भूतीवली वगळता अन्य दोन ठिकाणी धरणात असलेले पाणी हे शेतीसाठी सोडण्यात येत आहे. या सर्व पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्या साहाय्याने कर्जत तालुक्यातील शेतजमीन ओलिताखाली येत असते. तालुक्यात बांधण्यात आलेले पाझर तलाव हे रेल्वे परिसर वगळता अन्य सर्व भागात वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी बांधण्यात आले आहेत. त्याच वेळी पाली भूतीवली लघुपाटबंधारे धरण झाल्यानंतर कर्जत तालुक्यात सर्व भागात शेतजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी पाणी पुरवठा सिंचनासाठी करणारे धरण बनले होते.

डोंगरपाडा येथे असलेल्या पाथरज या पाझर तलावातील पाण्यावर डोंगरपाडा येथील शेती होते, मात्र त्यापुढे पाझर तलावामधून येणारे पाणी हे स्थानिक शेतकरी केवळ रोपवाटिका यांच्यासाठी वापरात आहेत. त्यामुळे या पाझर तलावाच्या पाण्यावर भाताची शेती पूर्णपणे केली जात नाही. तर कशेळे येथील पाझर तलाव गाळ आणि मातीने भरला आहे आणि त्यामुळे या पाझर तलावाचा कोणताही पाणी शेतीसाठी होत नाही. सुरुवातीला या पाझर तलाव परिसरातील 25 हेक्टर जमीन ओलिताखाली येत होती.खांडपे येथील पाझर तलावदेखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने स्थानिक शेतकर्‍यांना भातशेतीसाठी लागणारे पाणी शेती करण्यासाठी मिळत नाही. साळोख येथील पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात आली आहे, मात्र धरणात गाळ साचला असून त्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. परिणामी भाताच्या शेतीसाठी लागणारे पाणी स्थानिक साळोख, माले, फराटपाडा येथील शेतकर्‍यांना मिळत होते, मात्र धरणातील पाण्याची क्षमता आणि आताची गरज पाणी लक्षात घेता भातशेतीला लागणारे मोठ्या प्रमाणातील पाणी मिळणार नसल्याने शेतकरी भाताची शेती करण्यास धजावत नाहीत. खांडस येथे असलेला पाझर तलावाची भिंत 2005च्या अतिवृष्टीत अर्धी वाहून गेली होती, तर धरणाच्या पाणी साठवण क्षेत्रात माती आणि दगड येऊन थांबले आहेत, त्यामुळे या पाझर तलावात देखील मूळ साठवणीची क्षमता लक्षात घेता अर्धेच पाणी तलावात साठून राहिले आहे.

कर्जत तालुक्यात असलेल्या पाझर तलावांची पाणी साठवण करून ठेवण्याची क्षमता ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण तालुक्यातील खांडस आणि कशेळे येथील पाझर तलाव यात मोठ्या प्रमाणात माती आणि दगड हे पाझर तलावात येऊन साचले आहेत. त्यामुळे या दोन्ही पाझर तलावाच्या पाण्यावर भाताची शेती उन्हाळ्यात केली जात नाही, मात्र अन्य चारही पाझर तलावाच्या पाण्यावर दुबार शेती केली जात आहे. त्यात डोंगरपाडा येथील पाझर तलावावर मोठ्या प्रमाणात नळपाणी योजना यांचे ऊद्भव असून तेथील शेतकरी हे भाताची, तसेच नर्सरी शेतीदेखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. जामरूंग सोलनपाडा येथील शेती पाझर तलावाच्या पाण्यावर करीत असून तेथे देखील स्थानिक शेतकरी हे रोपे तयार करणारी नर्सरी करीत असतात. तर कळंब भागातील साळोख येथील पाझर तलावाच्या पाण्यावर साळोख, आसे, मालेया भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पाणी शेतात वळवून भाताची शेती करण्यावर कल त्या भागात दिसून येत आहे. तर खांडपे भागातील शेतकरी हे देखील त्या पाझर तलावाच्या पाण्यावर भाताची शेती, तसेच भाजीपाला शेती करीत आहेत.

त्याच वेळी व शेत जमीन सिंचनाखाली यावी यासाठी कर्जत तालुक्यात बांधण्यात आलेल्या दोन लघुपाटबंधारे धरणातील पाण्यावर भाताची दुबार शेती केली जात आहे. त्यातील अवसरे येथील धरणाच्या पाण्यावर अवसरे, कोदीवले, बिरडोळे येथील शेतकरी भाताची दुबार पीक घेत आहेत. त्या वेळी पाषाणे धरणाच्या पाण्यावर देखील सर्वाधिक शेती क्षेत्र आहे, पण रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाषाणे धरणाचे पाणी मात्र ठाणे जिल्ह्यातील शेतकरी यांच्या मदतीला जात आहे. त्या धरणातील पाण्यावर पाषाणे गावातील शेतकरी वगळता कर्जत तालुक्यातील अन्य भागात शेतीसाठी पाणी पोहचत नाही.त्यामुळे त्या धरणांच्या पाण्याचा कर्जत तालुक्याला काहीही फायदा होत नाही हे सातत्याने बोलले जाते, पण तेच पाषाणे धरण काही वर्षांपूर्वी फुटले होते आणि त्याचा सर्वाधिक फटका ठाणे जिल्ह्यातील गावांना बसला होता. आता त्या लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाण्याचा सर्वाधिक फायदा देखील ठाणे जिल्ह्यातील शेतीसाठी तेथील शेतकरी घेत आहेत.

कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा पाण्याच्या बाबतीत 2000 सालापर्यंत दुर्लक्षित होता. त्या ठिकाणी पाली भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्पाची शासनाने निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि धरणात 2004 मध्ये पाणी साठा झाला. त्यानंतर परिसरातील सर्व शेतकर्‍यांच्या जमिनीची पाणी पातळी वाढली आणि बोअरवेल खोदल्यानंतर पाणी मिळू लागले. तर आटलेल्या विहिरी देखील पाण्याने भरलेल्या स्थानिकांनी पाहिले आहे.त्याच भागातील तब्बल 1100 हेक्टर जमिनीवरील भाताची शेती करण्यासाठी 15 किमीचे कालवे बांधले जाणार होते आणि त्या कालव्यातील पाण्यावर त्या सर्व गावातील भाताची शेती केली जाणार होती, मात्र धरणात गेली 20 वर्षे पाणी साठून राहिले आहे, पण धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता आवश्यक असलेले कालवे मात्र लघुपाटबंधारे विभागाने बांधले नाहीत आणि परिणामी आजही त्या भागात धरणाचे पाणी शेतीसाठी देखील वापरले जात नाही. ही परिस्थिती शेतकर्‍यांवर बोटचेपे धोरण असलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांमुळे आली आहे.

कर्जत तालुक्यात पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्या पाण्यावर भाताचे दुबार पीक घेण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात भाताच्या शेतीबरोबर कडधान्य आणि भाजीपाला शेतीदेखील केली जात आहे. त्याच वेळी कर्जत तालुक्यात पाण्याची साठवण क्षमता असलेल्या भागातील शेती ही पाण्याखाली आल्याने तेथील परिसर हिरवागार दिसू लागला आहे. शेतात पाणी खळाळू लागल्याने पाणी येत असलेल्या भागात वातावरणात देखील गारवा दिसू लागला आहे, मात्र ज्यासाठी कर्जत तालुक्यात पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्प उभे राहिले आहेत. त्याचा उद्देश सध्या होताना दिसत नाही. हे सर्व पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे यामध्ये साचणारे पाणी भाताच्या शेतीसाठी पूर्ण क्षमतेने वापरता आले असते, तर कर्जत तालुक्यातील तब्बल 2000 हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती आणि खर्‍या अर्थाने हा तालुका भाताचे कोठार म्हणून आपली बिरुदावली सांभाळून ठेवू शकला असता.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply