Breaking News

महाड एमआयडीसीत वाहतूक नियोजनाचा अभाव

महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांत येणारी अवजड वाहने औद्योगिक परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महाड औद्योगिक क्षेत्राला ट्रक टर्मिनल (वाहनतळ)ची आवश्यकता आहे. मात्र या समस्येकडे एमआयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. महाड एमआयडीसीमध्ये असलेल्या कारखान्यातील मालाची आवक-जावक करण्यासाठी विविध ठिकाणाहून ट्रक, टँकर, ट्रॉली, क्रेन आणि इतर अवजड वाहने ये-जा करत असतात, मात्र कारखान्यातील मालाची वाहतूक करण्यासाठी आलेली वाहने कंपनीच्या आवारात उभी केली जात नाहीत. कंपनीच्या आवाराबाहेर रस्त्यालगत ही वाहने उभी केली जात असल्याने एमआयडीसीमधील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीस कायम अडथळा निर्माण होत आहे. यातील काही वाहने ही मुंबई-गोवा महामार्गावर नडगाव गावाजवळ दुतर्फा उभी केली जातात. या ठिकाणी उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हीच स्थिती नांगलवाडी फाटा ते महाड औद्योगिक पोलीस ठाण्यापर्यंत दिसून येत आहे. महाड नांगलवाडी ते एमआयडीसी हा मार्ग संपूर्णपणे या अवजड वाहनांनी व्यापलेला आहे. प्रमुख मार्गावरील सुदर्शन केमिकल, हायकल, प्रीव्ही ऑरगॅनिक, कोप्रान, या कंपन्यांसमोर अवजड वाहने कायम उभी असतात. आसनपोई गावाकडे जाणार्‍या मार्गावर आणि जिते गावाकडे जाणार्‍या धारिया इमेप्क्स, टायटन, कुसगाव गावाच्या मार्गावर एम्बायो, अनंत ऑरगॅनिक, इफ्का या कंपन्यांसमोर कायम उभ्या असणार्‍या अवजड वाहनांचा स्थानिक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्र विकसित करताना कारखान्यांना सोयी-सुविधा देणे बंधनकारक आहे, मात्र आजही अनेक सुविधा केवळ कागदावर राहिल्या आहेत. यातील ट्रक टर्मिनलकरिता सातत्याने मागणी केली जात आहे. अवजड वाहनांमुळे या रस्त्यांवर अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीसदेखील अडथळा निर्माण होत आहे. यामुळे संबंधित कंपन्यांनी आपल्या आवारात अवजड वाहने उभी करावीत, अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत, मात्र कंपन्यांच्या आवारात असलेली जागेची मर्यादा आणि येणार्‍या वाहनांची संख्या अधिक असल्याने हे ट्रक बाहेर रस्त्यावर उभे केले जातात. महाड, बिरवाडी आणि पुढे जाणार्‍या स्थानिक ग्रामस्थांच्या प्रवासी वाहनांनादेखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महाडमधून बिरवाडी आणि परिसरात एसटी वाहतूक, रिक्षा आणि इतर वाहनांची कायम वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ट्रक टर्मिनलकरिता महाड एमआयडीमध्ये अग्निशमन दलाच्या जवळच एक प्लॉट 1999 मध्ये विकसित करण्यात आला होता, मात्र हा प्लॉट एका कंपनीला देण्यात आला. भूखंड क्रमांक आर सात तर शेजारील 6000 चौरस मीटरचा मोकळा प्लॉट इंडिया पॉवर पार्टनर्स या कंपनीला देण्यात आला होता. मात्र 12 एप्रील 2017 रोजी हा प्लॉट ट्रक टर्मिनलकरिता हस्तांतर करण्याची विनंती एमआयडीसीने केली आहे. ट्रक टर्मिनलकरिता राखीव असलेला हा प्लॉट खाजगी कंपनीला कसा दिला हा प्रश्नच आहे. सध्या हा प्लॉटदेखील या कंपनीने परत केल्याचे एमआयडीसी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. असे असले तरी आजदेखील याच प्लॉटवर काही ट्रक उभे केले जात आहेत.

-महेश शिंदे

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply