अलिबाग : प्रतिनिधी
रायगडकर गेली काही दिवस गुलाबी आणि कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत असताना शनिवारपासून हवामानात अचानक बदल झाल्याने पारा कमालीचा खाली घसरला. परिणामी रायगडकर पुन्हा गारठले आहेत. थंडी ही आरोग्याला पोषक मानली जाते, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. गुलाबी थंडी हवीहवीशी वाटते, पण बोचरी थंडी त्रासदायक ठरते. गेल्या दोन दिवसांत रायगडकर या बोचर्या थंडीने त्रस्त झाले आहेत. शनिवारी रायगड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. थंड वारे वाहू लागले. त्यानंतर धुळकट वातावरण आणि वाढत्या गारव्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. आधीच जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यात या थंडीत सर्दी-खोकल्याचा त्रास अधिकच जाणवत आहे. कोवळे ऊन, म्हणजे सकाळी 8 ते 10ची वेळ मानली जाते, पण गेले दोन दिवस रायगडात भर दुपारीदेखील उन्हाचा चटका जाणवत नव्हता, इतका गारवा वातावरणात दिवसभर होता. ऐन दुपारी कोवळे ऊन अंगावर घेतल्यासारखे वाटत होते.
आंबा मोहरला : थंडी जशी आरोग्यदायी तशीच ती फळ पिकासाठी पोषक असते. विशेषतः आंब्याच्या पिकासाठी थंडी खूपच फायदेशीर ठरते. सातत्याने वातावरण बदलत असतानाही यंदा आंबा चांगलाच मोहरला असल्याचे पाहायला मिळत आहे. मधूनच अवकाळी पावसामुळे बागायदार चिंतेत आहेत, मात्र सद्यस्थितीत आंबा मोहरत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.