Tuesday , March 28 2023
Breaking News

खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी अकॅडमी, श्री समर्थ संघ जेते

मुंबई : प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित गोरेगावच्या प्रबोधन क्रीडाभवन येथे झालेल्या 32व्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेत पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि महिला गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर संघांनी विजेतेपद पटकाविले.

महिला गटाच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने परांजपे स्पोर्ट्स क्लबचा 9-8 असा एका गुणाने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. श्री समर्थने मध्यंतराला घेतलेली दोन गुणांची आघाडी निर्णायक ठरली. अनुष्का प्रभू, साजल पाटील व भक्ती धांगडे त्यांच्या विजयाच्या शिल्पकार होत्या. परांजपेच्या आरती कदम, श्रृती सकपाळ व रचना जुवळे यांनी सुरेख खेळ केला.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर 18-10 अशी मोठ्या फरकाने मात केली. त्यांच्यातर्फे अनिकेत पोटे, प्रतीक देवरे, यामीन खान, राहुल साळुंके व नितेश रूके चमकले.

महिला गटात शिवनेरी सेवा मंडळ तसेच पुरुषांमध्ये अमरहिंद मंडळ संघाने तिसरा क्रमांक मिळवला. पुरुष गटात सर्वोत्कृष्ट आक्रमकाचा मान यामिन खान याला (महात्मा गांधी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मिळाला. ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरचा प्रयाग कनगुटकर सर्वोत्कृष्ट संरक्षक, तसेच महात्मा गांधी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा प्रतीक देवरे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला.

महिला गटात आरती कदम (परांजपे स्पोर्ट्स क्लब), अनुष्का प्रभू आणि साजल पाटील (दोघीही श्री समर्थ व्यायाम मंदिर), तसेच व्यावसायिक गटात प्रसाद राडिये (पश्चिम रेल्वे), महेश शिंदे (बृहन्मुंबई महापालिका), श्रेयस राऊळ (बृहन्मुंबई महापालिका)  वैयक्तिक मानकरी ठरले.

Check Also

जलतरणपटू प्रभात कोळीचा भीमपराक्रम

न्यूझीलंडची कूक स्ट्राईट खाडी पोहून केली पार सात आव्हाने पूर्ण करणारा ठरला सर्वांत युवा स्विमर पनवेल …

Leave a Reply