Breaking News

प्रजासत्ताकाची सुखस्वप्ने

भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाला स्वत:चे असे संविधान नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या घटना समितीने रात्रंदिवस खपून भारतीय संविधान तयार केले, त्या संविधानाचा हा वाढदिवस आहे. गेल्या 73 वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. स्वतंत्र भारतात अनेक सरकारे आली आणि गेली. राजकारणाचे रूपरंग बदलत गेले. समाजाचे गाडे देखील पुढेमागे होत राहिले. परंतु या देशाचे संविधान सर्वशक्तीनिशी अग्रस्थानी राहील अशी श्रद्धा असणारे सरकार भारताला लाभले ते 2014 सालीच.

युगानुयुगांच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा प्रचंड मोठा वारसा पाठिशी घेऊन भारताचे प्रजासत्ताक बुधवारी आपला 73वा वाढदिवस साजरा करेल, तेव्हा स्वातंत्र्य चळवळीत ज्यांच्या पूर्वसुरींनी सहभाग घेतला त्यांना कृतकृत्य वाटेल याबद्दल शंकाच नाही. शतकानुशतके गुलामीचे साखळदंड पायात वागवल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्लीमध्ये स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आपण नियतीशी करार केल्याचे उद्गार त्यांनी काढले होते. 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटना समितीने तयार केलेले भारतीय संविधान स्वीकारण्यात आले, तेव्हा तो नियतीशी झालेला करार खर्‍या अर्थाने अंमलात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये भारताची सूत्रे गेल्यानंतरच भारतीय प्रजासत्ताकाने कात टाकली असेच म्हणावे लागेल. आज बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये शानदार संचलन होईल. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे संचलन म्हणजे भारताचा चालताबोलता सांस्कृतिक आणि सामाजिक वारसाच असतो. गेल्या 73 वर्षांमध्ये अनेकविध क्षेत्रांमध्ये भारताने घेतलेली गरुडझेप या संचलनामध्ये अचूक दिसते तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या कार्यक्रमात काही बदल करण्यात आले आहेत. मुख्य बदल म्हणजे यंदाचे संचलन नेहमीप्रमाणे ठीक दहा वाजता सुरू न होता, अर्धा तास उशीराने सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुमुहुर्तावर राजधानी दिल्लीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला. हा पुतळा उभा राहीपर्यंत ती जागा रिक्त न ठेवण्याची दक्षता देखील मोदी सरकारने घेतली. पुतळ्याच्या जागी नेताजींच्या प्रतिमेचा होलोग्राम उभा करण्याची तांत्रिक करामत करण्यात आली आहे. त्याचे जगभर कौतुक होत आहे. अर्थात या कौतुकाच्या गजरामध्ये काँग्रेसी जनांचा टीकेचा विसंवादी सूर देखील ऐकू येत आहे. गेल्या 73 वर्षांत बहुतेक वर्षे राजवट भोगूनही नेताजींचा पुतळा उभारावा असे काँग्रेसला कधीच सुचले नाही. किंबहुना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व लक्षात ठेवून या देशाच्या उभारणीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देखील काँग्रेस राजवटीने गमावली. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेला हा एकेकाळचा पक्ष आता स्वत:च्याच करणीने रसातळाला गेला आहे. तरीही ते त्यातून कुठलाही धडा शिकत नाहीत हे आश्चर्यकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षीय राजकारण दूर ठेवून प्रजासत्ताक दिनाची आन, बान आणि शान वाढवली हे कोणालाही अमान्य करता येणार नाही. राफेल विमानापासून ते चित्ताकर्षक चित्ररथांपर्यंत आणि तालबद्ध वाद्यवृंदापासून जवानांच्या कदमतालापर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या सर्वच गोष्टी प्रेरणादायी असतात. त्यातूनच प्रजासत्ताकाचे खरे सुखस्वप्न दिसू लागते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply