Breaking News

डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ; नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, पावणे, महापे, तुर्भे आदी भागात डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या भागांमध्ये आरोग्य विभागाकडून धुरीकरण आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तरी, रुग्णसंख्या वाढत असल्याने नवी मुंबई महापालिकेने घरोघरी शोधमोहीम सुरू केली आहे. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे या भागातील सर्व खासगी डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दी होत आहे, परंतु तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे डेंग्यूचे जानेवारीपासून आठ रुग्ण आढळल्याची नोंद आहे. त्यामुळे खासगी लॅबमधून समोर येणार्‍या अहवालांवर पालिकेतर्फे नजर ठेवली जाणार आहे. एमएमआर क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या बदलते हवामान, मोकळ्या भूखंडावर गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झोपडपट्टी बहुल आणि गावठाणातील चाळींमध्येही डेंग्यूची लक्षणे असणार्‍या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईत सध्या डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना योग्य दिशेने गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. या वेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील डेंग्यूच्या स्थितीचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेत डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, डेंग्यूचा संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्यावर योग्य वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असून त्यादृष्टीने नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी समनव्य राखून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

पालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी

कोरोनाला रोखण्यासाठी ज्याप्रमाणे हॉटस्पॉट निश्चित करून लक्ष केंद्रीत केले जाते, त्याचप्रमाणे डेंग्यूचा संशयित रुग्ण आढळल्यास त्या भागाकडे लक्ष केंद्रीत करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची कार्यवाही करावी. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी मादी आढळल्यानंतर संबंधित घरासह त्या परिसरातील 100 घरांचे सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते, ती अधिक प्रभावीपणे राबविण्यास तत्परतेने सुरुवात करावी. अधिक बारकाईने डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन ती त्वरित नष्ट करण्याची कार्यवाही करावी. तसेच डासनाशक फवारणी करण्याची कार्यवाहीदेखील अधिक प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. तर परिसरात वाढत्या डेंग्यू आणि हिवताप रुग्णांमुळे डासनाशक फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी नेरूळ विभाग अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply