ओबीसी जागा वगळून 13 जागांसाठी निवडणूक
माणगाव : प्रतिनिधी
येत्या 21 डिसेंबर रोजी माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 17 वार्डांतून 17 जागांसाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व अर्ज बुधवारी (दि. 8) झालेल्या छाननीत वैध ठरले असल्याची माहिती निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
या निवडणुकीतील ओबीसी सर्वसाधारण व महिलांकरिता आरक्षित असलेल्या माणगावमधील वार्ड क्र. 6, 8, 14, 17 या चार वार्डातील निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित 13 जागांसाठी निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. माणगावमधील ओबीसी आरक्षित वार्डातील निवडणूक स्थगित झाल्याने येथील नामनिर्देशन अर्ज भरलेल्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांचा, तसेच कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.