Breaking News

पनवेलचा सांस्कृतिक वारसा ‘अटल करंडक एकांकिका’

पनवेल शहराला असलेला संस्कृतिक वारसा अटल  ठेवण्यासाठी आणि मराठी रंगभूमीच्या विकासासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पनवेल शाखा प्रयत्न करीत असते. त्यामुळेच पनवेलमध्ये असलेल्या क्रांतिवीर वासुदेव बाळवंत फडके नाट्यगृहातील नाटकांना पनवेलकरांचा मिळणारा प्रतिसाद नेहमीच चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या माध्यमातून नाटक म्हटले की सर्व सामान्य माणसाची जी कल्पना असते ती मोडीत काढणारी व वेगळ्या धाटणीची सध्या कोणत्याही साच्यात न बसणारी, तसेच साचेबद्ध चौकटींना मोडून परिवर्तनाची दिशा अधोरेखित करणारी नाट्य अनुभूती ही पनवेलकरांनी अनुभवली आहे. पनवेलकरांच्या या नाटक प्रेमामुळेच अटल करंडक स्पर्धा किंवा हौशी मराठी नाट्य स्पर्धा असो त्यासाठी पनवेलला पहिली पसंती दिली जाते.

मल्हार करंडक म्हणून 2007 मध्ये राज्यस्तरीय स्पर्धा सुरू करण्यात आली. नाट्य चळवळ वद्धिंगत करण्यासाठी व नाट्य रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या माध्यमातून सन 2014 पासून या स्पर्धेचे ‘अटल करंडक एकांकिका’ नामकरण केले. या दर्जेदार स्पर्धेकडे अनेक नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत नेहमीच आकर्षित होताना दिसतात.

रमेश सिप्पी, प्रेमानंद गज्वी, गंगाराम गवाणकर, जयंत सावरकर, जयवंत वाडकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, आदिती सारंगधर, किरण जुनेजा, प्रदीप मुळे, राजन ताम्हणे, समीर खांडेकर, राजन भिसे, शर्वाणी पिल्ले, क्रांती रेडकर, विजय चव्हाण, विजय कदम, विजू खोटे, अविनाश खर्शीकर, संजय नार्वेकर, ऋतुजा देशमुख, मनोज जोशी अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या स्पर्धेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे.

देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ  यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या स्पर्धेला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि कलाकार व रसिकांच्या मागणीमुळे ही स्पर्धा कोकण व मुंबईपुरतीच मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय करण्यात आली. यंदा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आहेत.

राज्यातील  जळगाव, नागपूर, पुणे, पनवेल, रायगड या सर्व केंद्रांवर स्पर्धेच्या प्राथमिक फेर्‍या पार पडल्या असून, त्यातून अंतिम फेरीसाठी 25 एकांकिकांची निवड करण्यात आली आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून अंतिम फेरी 28, 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असल्याने पनवेलकर नाट्य रसिकांना एकांकिकांची मेजवानीच मिळणार आहे.

हो, पण कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच या वेळी नाट्यगृहात प्रवेश असणार आहे.

अभिनेता ओमकार भोजने यांनी 2016 साली झालेल्या एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार पटकाविला होता आणि ते आज या स्पर्धेचे ब्रॅण्ड अँबेसिडर आहेत. या वर्षी एकांकिका स्पर्धेचे थीम साँगही तयार करण्यात आल्याची माहिती परेश ठाकूर यांनी दिली. या स्पर्धेला सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची उपस्थिती लाभणार असून ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा पनवेलमध्ये होत आहे, हे पनवेलकरांचे सौभाग्यच असल्याचे परेश ठाकूर यांनी सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर पनवेलमध्ये नाट्य चळवळ उभी करीत आहेत, त्याला या स्पर्धेमुळे चालना मिळणार असून ही स्पर्धा निरंतर सुरू राहिल्यास महापालिका आणि नाट्य परिषदेची पनवेल शाखा मदत करण्यास तत्पर राहील, असे गटनेते परेश ठाकूर सांगितले.

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply