दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत प्रचंड खेळखंडोबा करून ठेवल्यानंतर शिक्षणविभागाने अखेर दोन्ही परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करायचे म्हटले तर विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून चिंता वाटू लागते आणि या निर्णयाला विरोध करावा तर विद्यार्थ्यांच्या नुकसानाची काळजी वाटते. अर्थात या निर्णयाचे काही नकारात्मक परिणामदेखील ढळढळीतपणे पुढे येऊ शकतात. कसा का होईना, पण एकदा या परीक्षांसंदर्भात निर्णय झाला हीच बाब स्वागतार्ह मानली पाहिजे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा याही वर्षी ऑनलाइनच घ्याव्यात, अशी मागणी होत होती. गेली दोन वर्षे कोरोनाच्या परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. शिक्षण क्षेत्राचे नुकसान म्हणजेच पर्यायाने विद्यार्थीवर्गाचेच नुकसान असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. या दोन्ही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने कसेबसे पार पडत होते. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादाही या काळातच उघड झाल्या. तथापि ऑनलाइन शिक्षण झाल्यामुळे परीक्षादेखील ऑनलाइनच घ्याव्यात, असा विद्यार्थी आणि पालक वर्गातील एका गटाचा आग्रह होता. गेल्या वर्षी दहावी व बारावीच्या शिक्षणमंडळाच्या म्हणजेच बोर्डाच्या परीक्षांचा निकाल अंतर्गत परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्यासोबतच आधीच्या गुणांच्या निकषांवर लावला गेला. त्यामुळे सब घोडे बारा टक्के या न्यायानेच निकाल लागल्यामुळे सगळेच उत्तीर्ण असे चित्र दिसले. साहजिकच अकरावीचा प्रवेश अत्यंत अवघड होऊन बसला. यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे नुकसान टाळण्याच्या इराद्याने पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेण्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. या निर्णयामुळे ऑनलाइन परीक्षेच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला हेदेखील चांगलेच झाले. ऑनलाइन शिक्षणाची महती गाणारे अनेक तथाकथित शिक्षणतज्ज्ञ समाजमाध्यमे तसेच टीव्ही वाहिन्यांवर वितंडवाद घालताना दिसत होते हे आता थांबेल. सध्याची तिसरी लाट लक्षात घेऊन शिक्षणमंडळाने परीक्षेत वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भरदेखील दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वेळीप्रमाणे अभ्यासक्रम 75 टक्केच ठेवला आहे. शिवाय, शाळा तेथे परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्र हे धोरण ठेवल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयात परीक्षा देता येतील. गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन अभ्यासाला जुळवून घेणार्या विद्यार्थीवर्गाचा लेखनाचा सरावदेखील सुटला असणार हेदेखील शिक्षणमंडळाने ध्यानात घेतले आहे. म्हणूनच मार्कांनुसार 15 मिनिटे ते अर्ध्या तासाचा अधिकचा वेळ प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुपही सोपे आणि मध्यम काठिण्य पातळीचे राहील. फक्त 10 टक्के प्रश्न आव्हानात्मक राहणार आहेत. भाषांचे गुण एकत्रित केले जातील तसेच गणित, विज्ञान हेदेखील एकत्रित गुण विचारात घेतले जातील. याखेरीज सवलतीचे गुण मिळवण्यात येणार असल्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना फारसे कठीण जाऊ नये. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन, त्यांची प्रात्यक्षिक व सराव परीक्षांमधील कामगिरी यांच्या शाळांनी केलेल्या मूल्यमापनावर निकाल लावले गेले होते. परिणामी कागदावर विद्यार्थ्यांची कामगिरी ठीकठाक दिसली तरी प्रत्यक्षात सुमारच राहिली. अशा उत्तीर्णांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काहिसा उपेक्षेचाच होता. यंदा मात्र प्रत्यक्ष परीक्षेला पर्याय उरलेला नाही. दहावी व बारावीचे मिळून सुमारे 32 लाख विद्यार्थी या परीक्षेच्या आव्हानाला सज्ज होत आहेत हीच समाधानाची बाब.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …