Breaking News

अवसायनातील कर्नाळा बँकेच्या शाखा बंद करण्याचा व्यवस्थापनाचा डाव

कोणतीही पूर्वसूचना न देता तळोजा शाखा बंद; ठेवीदार, खातेदार वार्‍यावर

पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केलेल्या 512 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यामुळे अवसायनात निघालेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेने आता होणारा खर्च झेपत नसल्याचे कारण देत भाड्याच्या जागेत उभ्या असलेल्या आपल्या शाखा हळूहळू बंद करण्याचा घाट घातलाय. बँकेतील या गैरव्यवहारामुळे ठेवीदार आणि खातेदारांचे अडकलेले पैसे मिळण्यासाठी कोणतेही उपाय कर्नाळा बँकेच्या व्यवस्थापनाने अथवा राज्य सरकारच्या सहकार खात्याने अद्याप योजलेले नसल्याने ठेवीदार आणि खातेदार मात्र वार्‍यावर आहेत.
कर्नाळा बँकची तळोजा फेज क्र. 1 मधील शाखा ही खातेदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता अलिकडेच बंद करण्यात आली. त्यामुळे बँकेने आता आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. कर्नाळा बँकेच्या शाखा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा घाट कर्नाळा बँकेच्या व्यवस्थापनाने घातला आहे का, असा संशय कर्नाळा बँकेचे ठेवीदार आणि खातेदारांना आहे. आता तळोजातील या जागेवर हार्डवेअरचे दुकान सुरू झाले आहे.
कर्नाळा बँकेच्या हवालदिल झालेल्या ठेवीदार आणि खातेदारांना शाखा बंद करण्याच्या या प्रकरणाची काहीच माहिती नाही तसेच त्यांचे कर्नाळा बँकेत गुंतलेले लाखो रुपये कसे आणि कोण परत देणार याबाबतही त्या सामान्य ग्राहकांना ना बँक व्यवस्थापनाने कल्पना दिली आहे आणि ना राज्याच्या सहकार खात्याने.
512 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करून कर्नाळा बँकेने 61 हजार खातेदारांचे आर्थिक नुकसान केले आहे. आता बँकेने गाशा गुंडाळण्यास सुरुवात केल्याची चर्चा सध्या तळोजा परिसरात सुरू आहे. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष विवेक पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी 63 बेनामी कर्ज खात्यांतून 512 कोटी रुपये लंपास केले. बँकेच्या या गैरव्यवहारासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2019मध्ये सहकार खात्याच्या लक्षात आणून दिले आणि स्पेशल ऑडिटर नेमण्याची सूचना राज्याच्या सहकार खात्याला केली. स्पेशल ऑडिटची सूचना एप्रिल 2019मध्ये केलेली असतानाही हे ऑडिट मात्र नोव्हेंबर 2019मध्ये झाले. या ऑडिटमध्ये सप्टेंबर 2019मध्ये 107 कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवले आहेत, असा स्पष्ट खुलासाही पुढे आला होता. जर सहकार खात्याने वेळीच या ठिकाणी तपासणी केली असती तर ठेवीदारांचे हे किमान 107 कोटी रुपये वाचू शकले असते.
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नामुळे कर्नाळा बँकेवर सहकार खात्यामार्फत प्रशासक नेमला गेला, पण ठेवीदारांना खातेदारांना आश्वस्त केले जाऊ शकेल असे एका ओळीचेही प्रसिद्धीपत्रक प्रशासकाच्या माध्यमातून अद्यापपर्यंत निघाले नाही. उलट प्रशासकांची बदली, पुन्हा नेमणूक, त्यानंतर प्रशासकालाच रोह्यात लाच घेताना अटक यामुळे त्याचीच चर्चा जास्त रंगली. मध्यंतरी ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत पैसे परत मिळतील असे कर्नाळा बँकेमार्फत सांगून त्यांच्याकडून केवायएससीचे फॉर्म भरून घेतले. त्यानंतर सहा महिने बँकेकडून अथवा सहकार खात्याकडून काहीच हालचाल झालेली नसल्याने ठेवीदार पैसे परत कधी मिळणार म्हणून चौकशी करीत आहेत.
विवेक पाटील यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केल्याने ते जेलमध्ये असले तरी इतर संचालकांवर सहकार खात्याने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांची मालमत्ता जप्त केलेली नाही. त्यातच तळोजा फेज-1मधील सेक्टर 11 प्लॉट नंबर 21 येथील पार्वती कॉर्नर येथे असणारी कर्नाळा बँकेची शाखा दोन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली तसेच तेथील बँकेचे सामानही इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता राजश्री इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड हार्डवेअर हे दुकान दिसत आहे. त्यामुळे या शाखेच्या खातेदारांमध्ये घबराट पसरली आहे.
‘कर्नाळा’ची कथा आणि ठेवीदार भाजीविक्रेतीची व्यथा
इंद्राबाई केणी कर्नाळा बँकेच्या तळोजा शाखेसमोरील फुटपाथवर अनेक वर्षे भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचे या बँकेत 200 रुपयांचे डेली सेव्हिंगचे खाते होते व त्यामध्ये 62 हजार रुपये जमा होते. त्यांचे पासबुकही शाखेच्या व्यवस्थापकाने घेतले, ते दिले नाही. त्यांना तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन घ्या असे सांगितले. इंद्राबाई व त्यांच्या मुलाचे बँकेत सुमारे सहा-सात लाख रुपये होते. बँक गेली, आता आम्हाला आमचे कष्टाचे पैसे मिळतील का, असे त्या डोळ्यांत पाणी आणून विचारत होत्या.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply