Breaking News

पनवेल न्यायालय परिसरातील वाहतूक कोंडी फुटली

पनवेल : रामप्रहर वृत्त

शहरातील न्यायालयाच्या परिसरात चारचाकी वाहनांना सोमवार ते शुक्रवार म्हणजेच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नो पार्कंगबाबत आणि दुचाकी वाहनांना सम-विषम पार्किंगबाबतची अधिसूचना पनवेल शहर वाहतूक विभागाच्या वतीने घोषित करण्यात आली होती. न्यायालयासमोरील परिसरात कार्यालयीन वेळेत चारचाकी वाहने पार्किंग केल्यास व दुचाकीस्वारांनी सम-विषम पद्धतीने वाहने पार्किंग न केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असे आवाहनही वाहतूक विभागाकडून करण्यात आले होते. त्यानुसार वाहतूक विभागाने नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला.

पनवेलमधील वाहतूक कोंडीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची वेळोवेळी बैठक होते. यामध्ये शहरातील रस्त्यांबाबत विभागवार प्रायोगिक तत्त्वावर उपाय राबविण्यात येत आहेत. त्यानुसार न्यायालय परिसरातील पार्किंगबाबत नवे नियम बनविण्यात आले. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी फुटली असून, न्यायालय परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशानुसार पनवेल शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या माध्यमातून महापालिकेच्यावतीने याठिकाणी ’नो पार्किंग’चे फलकही लावण्यात आले आहेत. तरीदेखील न्यायालयात येणारे काही नागरिक रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पनवेल शहर वाहतूक विभागाने अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. तर काही वाहनचालकांनी प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत न्यायालय परिसरात वाहने पार्किंग करणे बंद केले. त्यामुळे याठिकाणची वाहतूक कोंडी फुटली असून नागरिकही येथून विनाअडथळा ये-जा करीत आहेत.

पनवेल शहरातील न्यायालय परिसरात आजूबाजूला खाजगी हॉस्पिटल, पोलीस उपायुक्त कार्यालय, तालुका पोलीस ठाणे यासह इतरही महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत, तर न्यायालयाच्या समोरील बाजूस रहिवाशी सोसायट्यादेखील आहेत. याठिकाणी येणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply