Breaking News

पहाटेच्या प्रतिक्षेत

कोरोना विषाणूच्या भयानक आणि संहारक अशा संकटाशी दोन हात करता करता हिंदुस्तानला अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे. सरहद्दींवर प्रबळ शत्रूंनी जमवाजमव सुरू ठेवली असून त्यांना वठणीवर आणण्याचे काम भारताच्या सैनिकांना करावे लागेल. कोरोनाच्या संकटामुळे इतर सर्व देशांप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा पहिल्यासारखे जोमाने पळू लागेल याकडे अर्थतज्ज्ञांच्या फौजेला पहावे लागणार आहे.

पंधरा ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री स्वतंत्र भारताचा तिरंगा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला. त्यावेळी ‘नियतीशी केलेला करार’ निभावत स्वतंत्र भारताचा प्रवास येथवर येऊन ठेपला आहे. आज शनिवारी लाल किल्ल्यावर तुलनेने आटोपशीर समारंभात पंतपधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिरंगा फडकवतील, तेव्हा भारताच्या नियतीशी केलेल्या नव्या कराराचा प्रारंभ होईल. यंदाचा स्वातंत्र्य दिन अभूतपूर्व असा आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये अवघे जग होरपळत आहे. भारत देखील त्यास अपवाद नाही. अर्थव्यवस्था संकटात सापडल्यामुळे देशातील नागरिकांच्या मनात निर्माण झालेली अस्थिरता लवकरात लवकर दूर कशी होईल याकडे आता प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. अचानक अंगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशातील बरीचशी कारखानदारी, व्यावसायिक आस्थापना, व्यापार, दुकाने अजुनही बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. सामान्य लोकांच्या खिशात पैसा उरलेला नाही. लाखो लोकांचा रोजगार नष्ट झाला आहे. एकंदरीत या आघाडीवरील चित्र विदारक आहे. सरहद्दीवरील शत्रूला धूळ चारण्यास भारतीय लष्कर समर्थ आहे. परंतु खरी आव्हानात्मक लढाई देशाची पुन्हा उभारणी करण्याचीच आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे तेजस्वी नेतृत्व असल्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. त्यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली ही डोंगराएवढी आव्हाने आपण नक्कीच परतवून लावू. कित्येक दशकांनंतर भारताला त्यांच्यासारखे देदिप्यमान नेतृत्व लाभले. असे नेतृत्व की जे गोरगरिबांचा सर्वाधिक विचार करते. सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास या वचनाबरहुकुम वाटचाल करणारे सरकार आज देशाच्या केंद्रस्थानी आहे हे आपले सुदैवच म्हटले पाहिजे. आजच्या संकटकाळात असे विश्वासार्ह नेतृत्व असणे अन्य कुठल्याही देशाला हेवा वाटण्याजोगेच ठरेल. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकवार सत्तेत आले तेव्हा नव्या भारताच्या उभारणीची स्वप्ने देशासमोर होती. अजुनही ती स्वप्ने जिवंत आहेत. तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि उत्पादकता वाढीसाठी क्रांतिकारक प्रयत्न अशा तिहेरी टॉनिकचा डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देण्याची तयारी सुरू होती. परंतु कोरोना विषाणूने डाव साधला आणि प्रतिजैविकांचे डोस देण्याची पाळी अर्थव्यवस्थेवर आली. अर्थात तरीही सारेच संपले आहे असे नाही. महासंकटाच्या दारातही पंतप्रधान मोदी यांनी तब्बल 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून देशाला सुरक्षित केले. भविष्यवेधी शिक्षण धोरण जाहीर करून नव्या भारताचा पाया रचला. सरहद्दीवर मुजोर झालेल्या चीन आणि पाकिस्तानच्या लष्कराला सडेतोड जबाब दिला. नवी कोरी आणि सुसज्ज राफेल विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली तेव्हा सारा देश थरारून गेला. अनेक आघाड्यांवर लढताना पंतप्रधान मोदी यांची कोरोनाशी सुरू असलेली लढाई देखील सुरूच होती व आहे. या काळरात्रीची पहाट आजच्या स्वातंत्र्यदिनी उगवली आहे, असा विश्वास वाटतो.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply