नवी मुंबई ः बातमीदार
शीख पंथाचे संस्थापक गुरू नानक यांची शिकवण प्रदर्शित करणार्या स्तंभाचे अनावरण माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते नुकतेच झाले. गुरूनानक यांच्या 550व्या जयंती प्रकाश पर्वानिमित्त हा स्तंभ उभारण्यात आला आहे.
सायन-पनवेल महामार्गावरून वाशीत प्रवेश करताना हा स्तंभ दृष्टीपथास पडतो. वाशी गुरुद्वारा, दशमेश दरबार आणि सुप्रीम कौन्सिल नवी मुंबई यांच्या सहकार्याने तो निर्माण करण्यात आला आहे. वाशी गुरुद्वाराचे प्रमुख तेजंदर सिंग यांच्या संकल्पनेतून हा स्तंभ आकाराला आला असून आमदार गणेश नाईक यांच्या सहकार्यातून महामार्गालगत महाराष्ट्र आणि देशातील पाहिला गुरू नानक यांचा शिकवण स्तंभ साकारला गेला आहे.
या स्तंभाच्या निर्मितीमध्ये माजी महापौर सागर नाईक आणि माजी महापौर जयवंत सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे तेजंदर सिंग म्हणाले. 12 नोव्हेंबर 2019मध्ये या स्तंभाचा शिलान्यास झाला होता, मात्र त्यानंतर उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे त्याचे काम रखडले होते. ते आता पूर्णत्वास गेले आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, संपत शेवाळे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, सामाजिक कार्यकर्ते विजय वाळुंज, सुदत्त दिवे, सुप्रीम कौन्सिलचे जसपाल सिंग, कोपरखैरणे गुरूदवाराचे इंद्रजितसिंग भाटिया तसेच दिघ्यापासून कळंबोली, लोढापर्यंत असलेल्या 11 गुरूद्वारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवी मुंबईत स्मारक उभारणार
या स्तंभाच्या उद्घाटन समारंभात बोलताना आमदार गणेश नाईक यांनी गुरू नानक यांचे मानवतावादी विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी नवी मुंबईत योग्य ठिकाणी त्यांच्या स्मारकाची उभारणी करण्याचे जाहीर केले. शीख पंथीयांच्या नवी मुंबईच्या विकासातील योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.