Breaking News

11 लाख नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

नवी मुंबई मनपाची 100 टक्के लसीकरणाकडे वाटचाल

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत असून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र पहायला मिळते आहे. तथापि कोविड विषाणू अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून मास्कचा नियमित वापर व प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे व भर दिला जात आहे.

18 वर्षावरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या चार हजारापर्यंत पोहचूनही रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण मर्यादित होते. त्यामुळे तिसर्‍या लाटेची तीव्रता तितकीशी जाणवली नाही. नवी मुंबई महापालिकेने लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे व 102पर्यंत लसीकऱण केंद्र सुरू केल्यामुळे कोविडचा पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारी नवी मुंबई ही पहिली महापालिका होती. तोच वेग कायम राखत नवी मुंबई महापालिकेने दुसर्‍या डोसचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे व नागरिक लस संरक्षित व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले. त्या अनुषंगाने 10,93,341 नागरिकांना कोव्हीड लसीचे दोन्ही डोस दिलेले असून 98.76 टक्के नागरिक पूर्णत: लस संरक्षित झालेले आहेत.

18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाप्रमाणेच 15 ते 18 वयोगटातील कुमारांच्या पहिल्या डोसचेही 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या दुसर्‍या डोसचेही लसीकरण गतीमानतेने पूर्ण करून घेण्यात येत आहे.

दुसर्‍या डोसच्या लसीकरणाचेही सुव्यवस्थिती नियोजन करण्यात आले असून 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, चार रुग्णालये, इएसआय रुग्णालय वाशी येथील जम्बो केंद्र, एपीएमसी मार्केटमधील दाणा बाजार व भाजी मार्केट तसेच जुईनगर रेल्वे कॉलनी आरोग्य केंद्र या ठिकाणी दुसर्‍या डोसची कोविशिल्ड लसीकरण सुविधा उपलब्ध आहे तसेच नवी मुंबई महापालिकेची चार रुग्णालये आणि इएसआय रुग्णालय वाशी येथील जम्बो केंद्र या ठिकाणी कोव्हॅक्सिन लसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 15 ते 18 वयोगटातील कुमारवयीन मुलांच्या दुसर्‍या डोससाठी शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

याशिवाय दुसर्‍या डोससाठी पात्र असणार्‍या लाभार्थ्यांपर्यंत लसीकरण आपल्या दारी या विशेष मोहिमेंतर्गत पोहचून दुसर्‍या डोसच्या लसीकरणाचा वेग वाढविला जात आहे. याकरिता प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र पातळीवर 787 पथके कार्यरत असून 1 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 3,79,918 गृहभेटी देऊन 15,889 लाभार्थ्यांना लसीकरणासाठी कार्ड वाटप करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे 60 वर्षावरील नागरिकांनी तिसरा प्रिकॉशन डोस घेण्यासाठीही विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज होणा-या प्रिकॉशन डोसच्या लसीकरणातील लाभार्थी मानकर्‍याचे छायाचित्र महानगरपालिकेच्या विविध समाज माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे प्रिकॉशन डोसच्या लसीकरणालाही वेग आला असून दररोज 550 पर्यंत ज्येष्ठ नागरिक प्रिकॉशन डोसचा लाभ घेताना दिसत आहेत.

कोविडची लाट ओसरताना दिसत असली तरी कोव्हीड अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मास्कचा वापर नियमित करावा तसेच सुरक्षित अंतर व इतर कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. त्याचप्रमाणे लसीच्या दुसर्‍या डोसची तसेच प्रिकॉशन डोसची वेळ आल्यानंतर त्वरीत महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन विनामुल्य लसीकरण करून घ्यावे आणि लस संरक्षित व्हावे. -अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply