अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात फार्म पार्क प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी मुरूड व रोहा तालुक्यांतील काही गावांमधील शेतकर्यांच्या जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे. या भूसंपादनास स्थानिक शेतकर्यांचा विरोध असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा त्यास विरोध आहे. त्यामुळे सरकारने भूसंपादन मागे घ्यावे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिला. अॅड. महेश मोहिते मंगळवारी (दि. 12) पत्रकारांशी बोलत होते. प्रस्तावित फार्म पार्क प्रकल्पाकरिता भूसंपादन करण्यासाठी मुरूड, रोहा, अलिबाग तालुक्यातील गावांमधील शेतकर्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यासाठी 32/2च्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यास 50 टक्क्यांपेक्षा जास्त खातेदारांनी हरकती नोंदवून जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे, मात्र त्यांच्या हरकती लपविल्या जात आहेत. प्रांताधिकारी शासनाकडे चुकीचा अहवाल पाठवत आहेत. शेतकर्यांचा विरोध असूनही भूसंपादन लादले जात आहे. हा स्थानिक शेतकर्यांना भूमिहीन करण्याचा कट आहे, असा आरोप अॅड. महेश मोहिते यांनी या वेळी केला. काही लोकांनी मुरूड व रोहा तालुक्यात यापूर्वी जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत. त्या जमिनी विकल्या जाव्यात, आपल्याला आपले पैसे परत मिळावेत यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. या प्रस्तावित फार्म पार्क प्रकल्पाला शेतात राबून शेती करतोय त्या शेतकर्यांचा, येथील कोळी बांधवांचा विरोध आहे. जमिनी गेल्या तर शेतकरी व कोळी बांधव उद्ध्वस्त होतील, असे अॅड. मोहिते यांनी सांगितले. शेतकर्यांचा विरोध असतानादेखील शासनाला चुकीची माहिती देऊन हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न आहे. शेतकर्यांचा विरोध डावलून हा प्रकल्प आणला जात असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. शासनाने हे भूसंपादन मागे घ्यावे, अशी आमची मागणी आहे. ती मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा अॅड. महेश मोहिते यांनी दिला.
शासनाने एमआयडीसीच्या माध्यमातून यापूर्वी अलिबाग तालुक्यात अनेक जमिनी संपादित केल्या आहेत. त्या जमिनी नियोजित फार्म पार्क प्रकल्पासाठी द्याव्यात. शेतकर्यांच्या पिकत्या जमिनी घेऊन त्यांना भूमिहीन करू नये.
-अॅड. महेश मोहिते, अध्यक्ष, भाजप दक्षिण रायगड जिल्हा