Breaking News

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा मार्ग सुकर

वेणूनाथ कडू यांची माघार; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून वेणूनाथ कडू यांनी सोमवारी (दि. 16) आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप, शिवसेना, शिक्षक परिषद व मित्रपक्षांचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
कोकण भवन येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेणूनाथ कडू यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या वेळी महाराष्ट्र शिक्षक परिषेद व भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या संदर्भात माहिती देताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक गेली अनेक वर्षे शिवसेना, भाजप आणि शिक्षक परिषद तिन्ही एकत्रितपणे लढवत होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार्‍यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या विधान परिषदेच्या सर्व पाचही जागांसंदर्भात निर्णय घेत कोणती जागा शिक्षक परिषदेने लढवावी आणि कोणती जागा महाविकास आघाडीच्या विरोधात व कुणी लढवावी याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नागपूरमधील जागा शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना देण्यात आली. त्या ठिकाणी शिवसेना-भाजपचा त्यांना पाठिंबा आहे, तर कोकण शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी शिवसेना-भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना देण्यात आली. या ठिकाणी शिक्षक परिषद व इतर मित्र संघटनांचा त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळेच आमचे शिक्षक मतदारसंघाचे पदाधिकारी आणि कोकणातील शिक्षकांचे नेते वेणूनाथ कडू यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
या वेळी वेणूनाथ कडू यांनी सांगितले की, गेली 35 वर्षे महाराष्ट्र शिक्षक परिषद आणि भाजप या मतदारसंघात निवडणूक लढते. त्या अनुषंगाने स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला. गेली 35 वर्षे मला त्यांनी साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दाचा आदर करीत मी स्वखुशीने माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Check Also

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमधील आई मरिआई मित्र मंडळ रोहिदासवाड्याच्या वतीने आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply