Breaking News

मेंढपाळ कोकणात दाखल

पाली : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ व त्यांचे तांडे  कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल झाले आहेत. पाली-खोपोली राज्य महामार्ग, पेण-अलिबाग मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता शेळ्या व मेंढ्यांचे कळप दिसू लागले आहेत.

धनगर समाज बहुतांश ठिकाणी स्थिरावला असला तरी आजही मेंढपाळ गावोगावी आपला कबिला घेऊन भटकंती करताना दिसतोय. मान्सूनचा पाऊस सुरू होताच कोकणातील मेंढपाळ परतीच्या प्रवासाला लागतात. मात्र पावसाचा जोर कमी होताच साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर ते पुढे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मेंढपाळ कोकणात येतात.

शेतीच्या पूर्वमशागतीसाठी पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेतीची मशागत करत असत. हिवाळ्यात मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांचा मोठा कळप घेऊन आल्यावर दिवसा, रात्री आपले बिर्‍हाड एखाद्या शेतात घेऊन बसतात. त्यावेळी शेळ्या, मेंढ्याचे मूलमूत्र शेतात पडून शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होते. त्याला कारवणी पद्धत म्हणतात. कोकणात पूर्वीपासून चालत आलेली कारवणी पद्धत आजही आपले अस्तित्व टिकवून असल्याचे दिसते. ही कारवणी पद्धत मेंढपाळांना जगवतेय. शेळ्या, मेंढ्यांच्या लेंडीखताला मोठी मागणी असते. फळबागांनादेखील हे खत अधिक उपयुक्त ठरते. शेत जमीन अधिक कसदार होऊन उत्पादनात वाढ व्हावी याकरिता शेतकरी मेंढपाळांना दरवर्षी स्वतःहून बोलवून घेतात. कारवणी पध्दतीत एका रात्रीसाठी शेळ्या मेंढ्या शेतात बसवल्याने शेतकर्‍याकडून तांदूळ व पैसे बिदागी म्हणून दिली जाते. यातून मेंढपाळ आपला उदरनिर्वाह साधत असतो.

एका मेंढपाळाकडे सुमार 200 ते 250 मेंढ्या असतात. या कळपात शिकारी कुत्रे, घोडे, कोंबड्या यांचादेखील समावेश असतो. लहान मुलांना घोड्यावर बसवून ही सवारी थाटात जाताना आता सर्वत्र दिसू लागली आहे.

मेंढपाळ आता सुधागड पालीसह रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांचे मलमूत्र उपयुक्त ठरते, उत्पादनातही मोठी वाढ होते. त्यामुळे आम्ही त्यांना किमान एक दोन दिवस आमच्या शेतात मुक्काम करण्यास सांगतो. त्याबदल्यात त्यांना तांदूळ अथवा पैसे देतो.

-हरिचंद्र शिंदे, शेतकरी, पाली,  ता. सुधागड

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply