पनवेल : प्रतिनिधी
असंघटित कामगारांनी आपली सीएससीमार्फत ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असल्याने महापालिकेच्यावतीने प्रभाग अधिकारी त्या त्या प्रभागांमध्ये असंघटित कामगारांच्या नोंदणी विषयीचे आवाहन करणार आहेत. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे प्रतिपादन यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी केले.
केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक 31 डिसेंबर 2008 ला असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारीत केलेला आहे. या अंतर्गत असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने 26 ऑगस्ट 2021 रोजी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरिता ई-श्रम पोर्टल कार्यान्वीत केले आहे.
नोंदणीकृत असंघटित कामगारांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. ईश्रम नोंदणीनंतर अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दोन लाख तर अंशत: अपंगत्व् आल्यास 1 लाखाचा विमा मिळणार आहे. स्थलांतरीत कामगारांची माहिती ठेवणे शासनासाठी सुखकर होणार आहे. महापालिकेच्या सहकार्यातून असंघटित कामगारांची नोंदणी केली जावी याकरिता गुरुवारी (दि. 24) मुख्यालयात उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक कामगार आयुक्त शितल कुलकर्णी, गटविकास अधिकारी भोये, शासकीय कामगार अधिकारी स्नेहल माटे तसेच महापिालका अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
स्वयं रोजगार, घरेलु कामगार, असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारे कामगार, फळ व भाजीपाला विक्रेते, वृत्तपत्रे विक्रेते, विडी कामगार, शेत मजूर, रिक्षाचालक, मुक्त पत्रकार, फेरीवाले व इतर सुमारे 300 उद्योग व्यवसायातील कामगार तसेच संघटित क्षेत्रातील इतर कामगार ज्याना कामगार कायद्याचे संरक्षण नाही असे कामगार यामध्ये नोंदणी करू शकतात.
नोंदणी करण्याकरिता पात्रता वय 16 ते 59 वर्ष असून असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती यामध्ये नोंदणी करू शकते. फक्त नोंदणी करणारे कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचे सभासद नसावेत. या नोंदणीसाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक (राष्ट्रीयकृत बँक अथवा आयएमएससी कोड असलेली इतर कोणतीही बँक), स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक अथवा कुंटुंबातील अन्य व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक, ही कागदपत्रे आवश्यक आहे.तसेच स्वयं नोंदणीकरीता कामगाराचा भ्रमणध्वनी क्रमांक आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
ही नोंदणी स्वतः कर्मचार्यालादेखील करता येऊ शकते तसेच नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊनही करता येऊ शकते. त्याबरोबरच ई-श्रम पोर्टल eshram.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करता येऊ शकते. या नोंदणी करीता कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. कामगाराची नोंदणी प्रकिया पुर्ण झाल्यावर कामगारांस नागरी सुविधा केंद्रातील प्रतिनिधी कडून ए4 आकाराच्या पेपरवर UAN कार्ड काढून देण्यात येईल. अधिक माहिसाठी राष्ट्रीय हेल्प लाईन नं.-14434, टोल फ्री नं.-18001374150 या क्रमांकावरती संपर्क साधावा.