पनवेल : वार्ताहर
अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा-आपटा फाटा येथून ताब्यात घेतले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना आपटा फाटा-खारपाडा या ठिकाणी एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अत्यंत सतर्कतेने, शिताफीने सापळा रचून आरोपी मुसा सुलतान खान (वय 25) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण 13 लाख 25 हजार रुपयांचा मेथ एम्फेटामाइन याबा नामक अमली पदार्थाच्या 54.180 ग्रॅम वजनाच्या 530 गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे त्याच्याकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला मिळून आला आहे. आरोपीने भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्याच्या परवानगीशिवाय घुसखोरी करून भारतात प्रवेश केला तसेच भारतीय नागरिकांना देण्यात येणार्या व नमूद वर्णनाच्या बनावट कागदपत्राच्या आधार घेऊन खरी असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करीत आहेत.