पेण : प्रतिनिधी
हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या ओलिताखाली असलेली पेण तालुक्यातील रब्बी हंगामातील भातपिके तयार झाली असून, सध्या त्यांच्या कापणीची लगबग सुरू झाली आहे. मान्सूनपूर्व पाऊस दाखल होण्याआधीच परिपक्व झालेल्या भातपिकांची कापणी करण्यासाठी हेटवणे परिसरातील आधरणे, कामार्ली, वरवणे, सापोली बोरगांव, काश्मीरे गावातील शेतकर्यांची धावपळ सुरू झाली आहे. या सिंचन क्षेत्रातील शेतकरी सध्या भातपिक कापणी व मळणी कामात व्यस्त झाले आहेत.
हवामान शास्त्र विभागाने मोसमी पावसाचे संकेत दिल्याने पेण तालुक्यातील शेतकरी सावध होऊन आता भात पीक कापणी व मळणी पाठोपाठ करतांना दिसत आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भात झोडणीनंतर शिल्लक राहिलेला पेंढा वैरणीसाठी काळजीपूर्वक धान्यासोबत गाडीत भरून घराकडे नेताना दिसत आहेत. पावसाळी हंगामात पाळीव गुरांसाठी वैरणीची साठवणूक केली जाते. या वेळी भरघोस पिकांचे उत्पादन आल्याने शेतकरी खुश असल्याचे चित्र आहे.
भाताला प्रति क्विटल 1980 रुपये हमीभाव आहे. मात्र आता हमीभाव भात केंद्र बंद झाली आहेत. सध्या पेंढ्याच्या एका गुंडीला 8 ते 10 रुपये भाव मिळत असल्याने ज्यांच्याकडे पशुधन नाही असे शेतकरी वैरण विकून चांगली कमाई करीत आहे.