Breaking News

दरडग्रस्तांची पुनर्वसन संकुले झाली जीर्ण

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथे सिद्धिविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकूलाचा ताबा दरडग्रस्तांना लॉटरीद्वारे देण्यात आला आहे. मात्र, तेथे दरडग्रस्तांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यापूर्वीच या संकुलांचा जिर्णोध्दार करण्याची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे पोलादपूर तालुका सिद्धिविनायक ट्रस्टच्या मदतीचा योग्य विनियोग न झाल्याने पुनर्वसनास वंचित राहिला आहे. 25 व 26 जुलै 2005 रोजी या दोन्ही गावांमध्ये भूस्खलनामुळे दरडग्रस्त झालेल्यांसाठीच्या पुनर्वसन संकुलात न राहता दरडप्रवण क्षेत्रातच अद्याप दरडग्रस्त राहात आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी देवळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील केवनाळे आणि साखर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुतारवाडीतील दरडग्रस्तांच्या पुनर्वसन संकुलांचे पुढे काय होणार, याची केवळ भाकितं करणेच योग्य ठरणार आहे. 25 व 26 जुलै 2005च्या अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलनानंतर तालुक्यातील कोतवाल बुद्रुकमध्ये 6, कोतवाल खुर्दमध्ये 3 आणि लोहारमाळ-पवारवाडीमध्ये 2 जणांचा जमिनीत गाडले गेल्याने मृत्यू झाला. याखेरिज, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी येथेही मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने कोतवालसह कोंढवीमधील दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान निर्माण झाले. पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात पोलादपूर तालुक्यातील बोरावळे येथील 9 घरांच्या बांधकामानंतर तेथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गावांत 3, देवपूर येथे 4, पार्ले येथे 3, माटवण येथे 5, पोलादपूर- जोगेश्वरी गाडीतळ येथे 3, सडवली येथे 6, लोहारमाळ येथे 4, रानबाजिरे येथे 23, आड येथे 2, सवाद येथे 1 आणि हावरे येथे 6 अशी एकूण 61 घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला. पोलादपूर येथील चित्रे यांना घरबांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले. याखेरिज, कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28 घरकुले उभी राहतील एवढे क्षेत्र तर कोंढवी येथे 29 घरकुले उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले. सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबईने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली. कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या 48 तर कोंढवी येथे 78 कुटूंबे अशी असताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 45 लाख रूपये खर्चातून केवळ 15-15 घरकुलं उभारण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांत कोतवाल येथे घरकुलांपर्यंत जाणारा रस्त्यासाठी भूसंपादन करण्याकामी तत्कालीन तहसिलदारांनी केलेली कुचराई तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी सुभाष सोनावणे यांनी सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त सुभाष मयेकर यांच्याहस्ते 50 लाखांचा धनादेश प्रदान करतेवेळी नाराजीसह उघड केली, मात्र त्यानंतर कोंढवी आणि कोतवाल येथील घरकुलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी ती दिवसेंदिवस खालावत गेली. येथे वीज, पाणी, रस्ते, शाळा अशा मुलभूत सुविधांचा पुनर्वसन कार्यक्रमामध्ये समावेश असूनही त्याबाबत कार्यवाही झाली नाही. यातून ही घरकुले दरडग्रस्तांना ताबादिल्याविना ओसाड राहून ढासळू लागली. ठेकेदारांकडून त्याकडे दूर्लक्ष होऊ लागले. दुसर्‍या टप्प्यात मिळालेली रक्कम झालेल्या कामापोटीच मिळाली असे सांगून ठेकेदार त्याठिकाणी फिरकेनासेही झाले. कोंढवी येथे सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे बांधण्यात आलेल्या पुनर्वसन घरकुलांचा अनंत तुकाराम सकपाळ, काशिराम सदाशिव निकम, मुरलीधर गणपत शिंदे, लक्ष्मी दगडू निकम, काकासाहेब भागूराम जाधव, अनंत नारायण धोत्रे, अनुसया यशवंत निकम, सुंदराबाई गौरू महाडीक, शांताबाई शंकर सोनावणे, शांताबाई शिवराम मोरे, गंगाराम काळू यादव, विठाबाई केशव शिंदे, विनायक रखमाजी शिंदे आणि अर्जन मोतीराम निकम आदी 15 दरडग्रस्तांना लॉटरी पध्दतीने ताबा देण्यात आला. यापैकी अनंत सकपाळ, अनुसया निकम, शांताबाई मोरे, गंगाराम यादव आणि विनायक शिंदे या पाच जणांनी घरकुलांचा ताबा घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यापैकी चार जणांनी गृहप्रवेश केला. सध्या एकच दरडग्रस्त येथे वास्तव्यास असून अन्य लोक स्थलांतरीत झाले नाहीत, मात्र विद्युतपुरवठयाची लाईन या घरकुलांलगत असूनही महावितरणतर्फे नव्याने विजेचे काँक्रिटचे पोल उभे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. येथे पाणीपुरवठयाची व्यवस्था होण्यासाठी बोअरवेलचे काम टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत घेण्यात येण्याचे सांगण्यात आले. बापजी ठक्कर योजनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंजुरी मिळविलेल्या रस्त्याचे सपाटीकरणही झाले आहे. पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर उर्वरित दरडग्रस्त पुनर्वसन घरकुलामध्ये स्थलांतरीत होणार आहेत, असाही दावा प्रशासनाने केला होता. कोंढवी येथे पुनर्वसन घरकुलाची किंमत 49 लाख 49 हजार 651 रूपये एवढी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 21 घरकुलांची प्रशासकीय मान्यतेनुसार मंजूरी असताना केवळ प्रत्येकी 15 घरकुले बांधण्यात आली आहेत. यातही कोंढवीतील घरकुले बांधण्यात आलेल्या जागेचा वाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने नजिकच्या काळात तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. उर्वरित पात्र दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 75 लाखांचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यात आल्याने आता पुनर्वसन कामात राजकीय हस्तक्षेप आणि विलंब प्रशासनाकडून टाळला जाण्याची ग्वाही दोन वर्षांपूर्वी प्रशासनाकडून देण्यात येऊनही अद्याप कार्यवाही नाही. अन्य लॉटरी लागलेल्या दरडग्रस्त ग्रामस्थांनी पुनर्वसन घरकुलांकडे पाठ फिरविली आहे. आपद्ग्रस्तांची कागदोपत्री संख्या वाढविण्यात आल्याने या पुनर्वसन प्रकल्पाची वासलात लागली आहे. कोतवाल येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सुरूवातीपासूनच वादाच्या भोवर्‍यामध्ये राहिला. घरकुलांच्या इमारतींपर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्याचे भूसंपादन करण्यात तत्कालीन तहसिलदारांची कुचराई तत्कालीन जिल्हाधिकारी सुभाष सोनावणे यांच्या नाराजीचे कारण ठरली. सर्वच घरकुलांचे काम पूर्ण होऊनही हस्तांतरीत न झाल्याने घरकुलांची कौले, खिडक्या, भिंती यांचे खुपच नुकसान झाल्याने कोंढवीप्रमाणे कोतवालच्या घरकुलांचादेखील जिर्णोध्दार करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या 5-6 वर्षांत कोंढवी व कोतवालच्या पुनर्वसन कामाकडे संबंधित ठेकेदार, पुनर्वसन यंत्रणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या दूर्लक्षामुळे आता ही घरकुले ’छप्पर फाड के’ गळणार्‍या पावसाने आतूनही ओलीचिंब झाली आहेत. घरकुलांच्या भिंती भिजून ओघळू लागल्या आहेत. परिसरात गवत माजले आहे. रस्त्यासह कोणत्याही नागरी व मुलभूत सुविधा येथे उपलब्ध झाल्या नसल्याने आता तेथे झालेल्या अक्षम्य दूर्लक्षाच्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या आहेत.

-शैलेश पालकर

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply